जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:12+5:302021-03-22T04:25:12+5:30
शंकरपूर : चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. ...

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन
शंकरपूर : चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. या इमारत बांधकामासाठी चिमूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य विद्या चौधरी यांनी दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
हे गाव सहाशे लोकवस्ती असून या गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चवथ्या वर्गापर्यंत शाळा आहे. शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची व्यवस्था जिल्हा परिषद चंद्रपूरद्वारा करण्यात आली आहे. सदर शाळेत गावातंर्गत ५ ते १० वयोगटातील लहान मुले शिक्षणाचे धडे गिरवितात. चिचाळाशास्त्री गावातील शाळेची एकमेव इमारत जीर्ण झाली असून ती इमारत केव्हा पडेल, याचा नेम नाही.
यामुळे लहान मुलांचे आयुष्य व भविष्य बघता चिमूर पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान पं. स. सदस्य विद्या चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून चिचाळाशास्त्री येथे शाळेच्या इमारतीचे बांधकाम मंजूर करावे, असे वारंवार विनंतीपूर्वक पत्र दिले. परंतु चंद्रपूर जिल्हा परिषद सीईओंनी चिचाळाशास्त्री येथे नवीन शाळा बांधकाम इमारत मंजूर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असल्याचे माजी सभापती विद्याताई चौधरी यांचे म्हणणे आहे.
बॉक्स
एका इमारतीत दोनच खोल्या
चिचाळाशास्त्री येथे शाळेची एकच इमारत असून सदर इमारती अंतर्गत वर्गखोल्या केवळ दोन आहेत. या दोन वर्गखोल्यात १ ते ४ वर्गातील विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित असून विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांना मोठी अडचण जात आहे. ही बाब व इमारत जीर्ण असल्याची बाब चिचाळा शास्त्री येथील नागरिकांनी माजी सभापती विद्या चौधरी यांच्या लक्षात आणून दिली.
त्यांनी प्रत्यक्ष शाळेची पाहणी केल्यानंतर शाळा इमारत जीर्ण झाल्याचे दिसून आले.