खिचडीसाठी विद्यार्थी झेडपीत धडकले
By Admin | Updated: September 29, 2014 23:02 IST2014-09-29T23:02:15+5:302014-09-29T23:02:15+5:30
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी सुदृढ राहावे, त्यांच्या पोषणाचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी देण्याची योजना सुरु केली आहे. मात्र जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील

खिचडीसाठी विद्यार्थी झेडपीत धडकले
चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी सुदृढ राहावे, त्यांच्या पोषणाचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी देण्याची योजना सुरु केली आहे. मात्र जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील विद्यार्थ्यांना मागील दोन महिन्यांपासून नियमित खिचडी मिळत नसल्याची तक्रार घेऊन तेथील चिमूकले विद्यार्थी चक्क जिल्हा परिषदेवर धडकले. एवढेच नाही तर, त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या अभ्यागत कक्षामध्येही प्रवेश घेत न्याय देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या या प्रकाराकडे सर्र्वांचे लक्ष लागले होते.
जिवती येथून काही अंतरावर असलेल्या आंबेझरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. या कारभाराला ग्रामस्थही कंटाळले आहे. विशेष म्हणजे, शाळा व्यवस्थापन समितीची नेमणूकच केली नसल्याचा प्रकार आज मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उघडकीस आला.
येथील शाळेमध्ये दोन महिन्यापूर्वी ज्या महिलांकडे खिचडी शिजविण्याचे कंत्राट होते त्यांनाच पुन्हा खिचडी शिजविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यार्र्थ्यांची आहे. या मागणीसाठी विद्यार्र्थी तसेच पालकांनी प्र्रथम मुख्याध्यापकाला निवेदन दिले. मात्र त्यांच्या निवेदनाचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर ग्र्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनालाही त्यांनी केराची टोपली दाखविली. शाळेत विद्यार्थ्यांना योग्य दर्जाची खिचडी मिळत नसल्याने मागील पंधरा दिवसापासून काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेही सोडून दिले आहे. मुख्याध्यापक तसेच पंचायत समितीस्तरावरील अधिकाऱ्यांच्या धोरणाला कंटाळून शेवटी विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हा परिषदेत धडक दिली.
विद्यार्थी जिल्हा परिषदेत आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे, निवेदन देण्यापूर्र्वी विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या आवारात झाडाच्या सावलीत बसले. यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. या प्रकारानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यागत कक्षामध्ये बसण्याची व्यवस्था केली. त्यानंतर ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. यावेळी मागण्या पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान मंगळवारी सकाळी १०.३० वााजता शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, सरपंचाची बैठक बोलावून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी दिले.
निवेदन देण्यासाठी विद्यार्थ्यांसह तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिगांबर ढाले, सरपंच शोभा मडावी, पोलीस पाटील सुर्र्यभान मडावी यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)