युती शासनाकडून विद्यार्थ्यांची चेष्टा
By Admin | Updated: April 24, 2015 00:53 IST2015-04-24T00:53:46+5:302015-04-24T00:53:46+5:30
दुष्काळग्रस्त भागाला तत्परतेने मदत देण्याची घोषणा करणाऱ्या युती शासनाने विद्यार्थ्यांचीही चेष्टा केली आहे.

युती शासनाकडून विद्यार्थ्यांची चेष्टा
मंगेश भांडेकर चंद्रपूर
दुष्काळग्रस्त भागाला तत्परतेने मदत देण्याची घोषणा करणाऱ्या युती शासनाने विद्यार्थ्यांचीही चेष्टा केली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याची शासनाने घोषणा केली खरी मात्र, अद्यापपर्यंत एक दमडीही विद्यार्थ्यांच्या हातात पडलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त घोषित झालेल्या ३९३ गावांतील दहावी व बारावीच्या २६७७ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ स्वरूपात १४ लाख ५८ हजार ८२५ रूपये शासनाकडून येणे आहे.
संपूर्ण राज्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळाच्या कचाट्यात सापडल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची प्रतीक्षा आहे. काही प्रमाणात मदत मिळाली असली तरी मिळणारी मदत ही तुटपुंजी ठरत आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणे गरजेचे आहे. परंतु, प्रत्यक्षात जिल्ह्यात एकाही विद्यार्थ्याला परीक्षा फीची रक्कम परत मिळालेली नाही.
नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर तब्बल १४ लाख ५८ हजार रूपये शासनाकडून येणे बाकी आहे.
शासकीय मदत वाटप करताना वेळ खाऊपणा होत असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परीक्षा फी माफीचा निर्णय झाल्यानंतरही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी वसूल करण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षाही दिली. परंतु, शासन अद्यापही फी परत करण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.
दुष्काळी चक्रव्यूहात अडकलेल्या नागरिकांना वेळेत मदत मिळाली तर त्या मदतीचा लाभ होईल. परंतु, उशिरा मदत देऊन मदतीतही चालढकलपणा करण्याचे धोरण सध्या शासनाकडून सुरु आहे. दहावी परीक्षेसाठी ३०० रूपये तर बारावीच्या परीक्षेसाठी कला अभ्यासक्रमाला ४३० आणि विज्ञान अभ्यासक्रमासाठी ४४५ रूपये परीक्षा शुल्क घेण्यात आले. याचे १४ लाख ५८ हजार रूपये येणे आहेत.