देशभक्तीचा उत्सव विद्यार्थ्यांनी साजरा केला घरातूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:46+5:302021-02-05T07:35:46+5:30
गोवरी : प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राष्ट्रीय ऐक्याचा, देशभक्तीचा, आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. या दिनानिमित्त प्रत्येक शाळा, महाविद्यालयात सांस्कृतिक ...

देशभक्तीचा उत्सव विद्यार्थ्यांनी साजरा केला घरातूनच
गोवरी : प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राष्ट्रीय ऐक्याचा, देशभक्तीचा, आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. या दिनानिमित्त प्रत्येक शाळा, महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमातून बालकलाकार कौशल्य सादर करतात. मात्र, कोरोना संकटामुळे यावर्षी प्रजासत्ताक दिनाचा हा आनंद विद्यार्थ्यांना लुटता आला नाही. संकट काळात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मात्र शिवाजी हायस्कूल, गोवरीने अभिनव उपक्रम आखला. ऑनलाईन मंचावर विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुणांना सादर करण्याची संधी दिली.
शिवाजी हायस्कूल, गोवरी ही शाळा उपक्रमशील म्हणून ओळखली जाते. पवणी, माथरा, गोयेगाव, चिंचोली या गावातील विद्यार्थी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी विद्यालयात येतात. प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी आठवडाभरापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन मंचावर आपले कलागुण सादर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. मुख्याध्यापक बी. एन. ठावरी, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख, तंत्रस्नेही शिक्षक आनंद चलाख, रश्मी कोंतमवार यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. देशभक्तीपर, नृत्य, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम, कोरोनावर जनजागृती, भाषण स्पर्धा, गायन स्पर्धा इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या घरातच व्हिडिओ तयार केले आणि शाळेच्या ग्रुपवर पाठविले. गायत्री पायपरे व सुकेशनी वाघमारे या दोन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचालनाची जबाबदारी सांभाळली आणि घरूनच रेकॉर्डिंग केले. तंत्रस्नेही शिक्षक आनंद चलाख व सांस्कृतिक प्रमुख शिक्षकांनी या सर्व व्हिडीओ क्लिपचे एकत्रीकरण केले आणि एक तासाचा ऑनलाईन सोहळा शाळेच्या युट्यूब चॅनलवर प्रसारित केला.