आधार कॉर्डसाठी विद्यार्थिनीची पायपीट
By Admin | Updated: July 5, 2017 01:10 IST2017-07-05T01:10:57+5:302017-07-05T01:10:57+5:30
तालुक्यातील अनेक व्यक्तींचे आधारकॉर्ड अजूनही निघाले नाही. परिणामी पसिरातील शाळकरी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी भासत आहेत.

आधार कॉर्डसाठी विद्यार्थिनीची पायपीट
प्रशासनाचे दुर्लक्ष : जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : तालुक्यातील अनेक व्यक्तींचे आधारकॉर्ड अजूनही निघाले नाही. परिणामी पसिरातील शाळकरी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी भासत आहेत. पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा येथील विद्यार्थिनी मागील एका वर्षापासून अधारकॉर्डसाठी प्रयत्न करत आहे. मात्र अजूनही तिला आधार कॉर्ड मिळाले नाही. अनेक महाआॅनलाईन सेवा केंद्रातून तिला आधार कॉर्ड विना परतावे लागले असल्याने शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती व इतर योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आधार कॉर्ड देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील चांगेश्वरी निळकंठ नैताम नामक मुलीने ग्रामपंचायत देवाडा खुर्द येथे आई-वडीलांसोबत चार वर्षापूर्वी आधार कॉर्ड नोंदणी केली. त्यावेळी हे काम एका खाजगी एंजन्सीला देण्यात आले होते. सबंधीत कंत्राटदारांने कुठल्याही प्रकारची पावती लाभार्थ्यांना दिली नाही. नोंदणी केलेल्या अनेकांचे आधार कार्ड टपाल कार्यालयामार्फत पोहचता करण्यात आले. परंतु, त्यातील अनेकांचे आधार कार्ड मिळालेच नाही. असाच प्रकार चांगेश्वरीच्या बाबतीत घडला आहे. तिच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना आधार कार्ड मिळाले. परंतु दोन वर्षे लोटूनही तिचे आधार कार्ड पोहोचलेच नाही. तेव्हा नव्याने आधार कॉर्ड तयार करण्यासाठी ती आपल्या वडिलासोबत पोंभुर्णा, बल्लारपूर, कोठारी, मूल, चंद्रपूर आदी ठिकाणी असलेल्या महाआॅनलाईन सेवा केंद्रामध्ये गेली असता, प्रत्येकांनी यापूर्वीच आधार कॉर्डची लिंक झाली असल्याने आता नव्याने आधार कॉर्ड निघणे शक्य नसल्याचे सांगितले. तर यापूवी आधार कॉर्ड काढतांना मिळालेली पावती आणण्यास सांगीतले जाते. मात्र त्यावेळी कुठलीही पावती देण्यात आली नाही. मात्र नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी दुसरा पर्यायच नसल्याचे सांगीतले. त्यामुळे चांगेश्वरीची आधारकॉर्डसाठी पायपीट सुरु आहे.
विद्यार्थिनीची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
शासनाने एकीकडे सर्व स्तरावर आधार कॉर्डची सक्ती केली आहे. तर दुसरीकडे संघर्ष करूनसुध्दा आधार कॉर्ड निघत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण जात आहे. चांगेश्वरीने पोंभुर्णा येथील तत्कालीन तहसीलदार हरीश गाडे यांचेशी संपर्क साधून आधार कॉर्डबद्दल विचारले असता, कार्यालयात अर्ज करण्यास सांगितले त्यानुसार त्या ठिकाणी अर्ज सादर करुन एक वर्षाचा कालावधी लोटला. परंतु, त्यांनी सुध्दा कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे सदर विद्यार्थीनी व पालकांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन अर्ज दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईला सदर माहिती पाठविणार आहेत. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी आधार कॉर्ड निघणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी चांगेश्वरीला सांगितले.
शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार
देवाडा खुर्द येथील चांगेश्वरी ही विद्यार्थीनी बल्लारपूर येथील एका इंजिनीअरींग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून ती शासकीय वसतिगृहात राहून शिकत आहे. वसतिगृह, व शिष्यवृत्तीसाठी आधार कॉर्डची गरज आहे. मात्र तिच्याकडे आधार कॉर्ड नसल्याने अडचण निर्माण होत आहे.