विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:02 IST2017-12-25T00:01:40+5:302017-12-25T00:02:07+5:30

विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचा कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेचे तीन किमी अंतरावर असलेल्या जेना येथे समायोजन झाले. हे समायोजन होऊन आठवडा लोटला.

Student deprived of education | विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

ठळक मुद्देबेलोरा शाळेचे समायोजन : शाळेच्या वेळेत विद्यार्थी बसतात मंदिरात

विनायक येसेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याचा कारणावरुन तालुक्यातील बेलोरा शाळेचे तीन किमी अंतरावर असलेल्या जेना येथे समायोजन झाले. हे समायोजन होऊन आठवडा लोटला. मात्र शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी व पालकांनी मुलांना जेना येथील शाळेत पाठविण्यास नकार दिल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले आहेत.
शिक्षणापासून कोणतेही मुले वंचित राहता कामा नये, यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. अशातच शासनाने ० ते १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. त्या शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांचे समायोजन जवळपास असलेल्या गावातील शाळेत करण्याचे पत्रसुद्धा काही शाळांना देण्यात आले आहे. तालुक्यातील बेलोरा या गावातील शाळेला असेच पत्र मिळाल्याने या शाळेचे पूनर्वसन तीन किमी अंतरावर असलेल्या जेना या शाळेत करण्यात आले. त्यामुळे येथील शिक्षकांनी १९ डिसेंबरला बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले व विद्यार्थ्यांना समायोजन झालेल्या जेना येथील शाळेत पाठविण्यास पालकांना सांगितले.
१ ते ४ वर्ग असलेल्या बेलोरा शाळेतील विद्यार्थी लहान असल्याने येथील शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी विद्यार्थ्यांना समायोजन झालेल्या शाळेत पाठविण्यास नकार दिला व येथील संवर्ग विकास अधिकारी व शिक्षण विभागाला निवेदन देवून ही शाळा या गावातच कायमस्वरूपी ठेवण्यात यावी किंवा विद्यार्थ्यांना जाण्या-येण्याची सुविधा करून द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. या शाळेला कुलूप ठोकून जेना येथील शाळेत शिक्षक रूजूसुद्धा झाले. परंतु बेलोरा येथील विद्यार्थ्यांची शाळा मात्र बंद झाली आहे.
पालकवर्ग शेतीच्या मजुरीसाठी जात असतात. मुलांना शाळेत पोहचविण्यासाठी किंवा त्यांना शाळेतून घेऊन येण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नसल्याने गेल्या आठवड्याभरापासून येथील मुले बेलोरा येथील मंदिरात शाळेच्या वेळेपर्यंत बसत आहे. त्या मुलांकडे येथील शाळा व्यवस्थापन समिती लक्ष देण्याचे काम करीत आहे. शासनाच्या या शाळा समयोजन निर्णयाचा फटका बेलोरा या गावाला बसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असल्याचे तुर्तास दिसून येत आहे.

Web Title: Student deprived of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.