विद्यार्थ्याने रचले स्वत:च्या अपहरणाचे नाट्य
By Admin | Updated: March 16, 2015 00:40 IST2015-03-16T00:40:54+5:302015-03-16T00:40:54+5:30
शाळेला बुट्टी मारून वेळ इतरत्र गमावणाऱ्या विद्यार्थ्याची शिक्षकांनी आईवडिलांकडे तक्रार केली. आईवडिलांनी रागावल्याने स्वत:चे अपहरणाचे नाट्य घडवून आणले.

विद्यार्थ्याने रचले स्वत:च्या अपहरणाचे नाट्य
बाबूपेठ (चंद्रपूर) : शाळेला बुट्टी मारून वेळ इतरत्र गमावणाऱ्या विद्यार्थ्याची शिक्षकांनी आईवडिलांकडे तक्रार केली. आईवडिलांनी रागावल्याने स्वत:चे अपहरणाचे नाट्य घडवून आणले. पोलिसात तक्रार झाल्यानंतर आपण स्वत:चे अपहरण केल्याची कबुली विद्यार्थ्यांना पोलिसाकडे दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने केलेल्या अपहरण नाट्यावर आता पडदा पडला आहे.
मागील दोन दिवसांपासून चंद्रपुरात विद्यार्थी बेपत्ता झाल्याचे प्रकरण चर्चेचा विषय बनले होते. शहर पोलीस ठाण्यात विद्यार्थी बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले. दरम्यान शहर पोलिसांनी गंभीरतेने घेऊन यातील सत्यता उजेडात आणली आहे.
गोपालपुरी वॉर्डातील एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने रागामध्ये रेल्वेस्थानकावर जाऊन थेट रायपूर गाठले. येथे गेल्यानंतर मात्र त्याची भंबेरी उडाली. आता कसे करायचे या विचाराने त्याने कुटुंबीयांना एका नागरिकाकडून फोन करून आपले अपहरण झाल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांकडे तक्रार असल्याने याबाबतची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल नंबर ट्रॅप करून त्याचा शोध घेतला असता तो नागपूर येथे आल्याचे पोलिसांना समजले. त्याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आपण स्वत:च पळून गेल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय भारती यांनी दिली. (वार्ताहर)