आयटीआयचे स्थलांतर रखडल्याने विद्यार्थी नाराज
By Admin | Updated: June 15, 2017 00:35 IST2017-06-15T00:35:31+5:302017-06-15T00:35:31+5:30
राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) बल्लारपूरच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम वर्षाभरापूर्वीच करण्यात आले.

आयटीआयचे स्थलांतर रखडल्याने विद्यार्थी नाराज
सुसज्ज इमारत अडगळीत : व्यवसाय शिक्षण संचालनालयाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) बल्लारपूरच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम वर्षाभरापूर्वीच करण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी वीज जोडणी करण्यात आली. परंतु व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या संचालनालयाचे याकडे दुर्लक्ष असून आयटीआयचे स्थलांतर रखडल्याने विद्यार्थ्यात नाराजी उमटली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यासाठी तालुकानिर्मिती नंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली. प्रारंभी येथील पत्ता गोडावूनच्या इमारतीत विद्यार्थ्यांना प्रक्षिणाची सुविधा करण्यात आली. त्यासाठी इमारतीचे वार्षिक भाडे तीन लाख ८४ हजार रुपये देण्याची तरतूद केली. व्यवसाय शिक्षण संचानलनालयाने दीड वर्षापूर्वी स्वत:ची इमारत उभारली.
चंद्रपूर-बल्लारपूर राज्य महामार्ग दरम्यान विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भिवकुंड येथे अद्यावत स्वरूपात देखणी व सुसज्ज इमारत बांधली. सर्व सुविधायुक्त वास्तू उभी असताना केवळ उद्घाटनासाठी बल्लारपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर रखडल्याची माहिती आहे. चालू शैक्षणिक सत्रात सुसज्ज असलेल्या इमारतीत विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण घेण्याचे वेध लागले असताना केवळ शासकीय सोपस्काराअभावी विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाराजीचा सूर उमटला जात आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मध्यंतरी वीज जोडणीची समस्या उद्भवली होती. यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकून वीज जोडणीची समस्या दूर करण्यास हातभार लावला. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सार्थक प्रयत्नामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विसापूरच्या हद्दीत आली. अद्यावत व सर्व सोयीसुविधा युक्त इमारत आकारास आली. मात्र अजूनही सुरु झाली नाही.
विसापूर गावाच्या हद्दीत भिवकुंड परिस२ात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून नवीन इमारतीत प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागपूर विभागाकडे स्थलांतराचा प्रस्ताव सादर केला आहे. सहसंचालक यांनी सदर प्रस्तावाला मान्यता देताच स्थलांतराची प्रक्रिया केली जाईल. चालू शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना नवीन इमारतीत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- अमर जाधव, प्राचार्य,
शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, बल्लारपूर