गावकऱ्यांच्या वादात अडकली माथरा पाणीपुरवठा योजना
By Admin | Updated: May 8, 2015 01:10 IST2015-05-08T01:10:25+5:302015-05-08T01:10:25+5:30
शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविते. शासकीय योजना निट राबविली तर गावाच्या विकासात योजना सार्थकी लागते.

गावकऱ्यांच्या वादात अडकली माथरा पाणीपुरवठा योजना
गोवरी : शासन ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविते. शासकीय योजना निट राबविली तर गावाच्या विकासात योजना सार्थकी लागते. मात्र गावकऱ्यांनी केलेल्या मोटरपंप स्विचरूमच्या वादात गावकऱ्यांनाच पाणीपुरवठा नळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ माथरावासीयांवर आल्याने नागरिकांना दारोदार पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
राजुरा तालुक्यातील माथरा हे राजुरा-कवठाळा मुख्य मार्गावरील ६७० लोकसंख्या असलेले गाव. या गावात दोन-तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाण्याची टाकी मंजूर होऊन बांधकामाला सुरूवात झाली. ग्रामपंचायतीने यासाठी भूमिगत पाईपलाईन गावात टाकली. पाणी पुरवठा नळयोजनेचे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणार असल्याने महिलांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबणार, याचा आनंद गावकऱ्यांना होता. पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाल्यामुळे नागरिकांना लवकरच नळयोजनेचे पाणी मिळेल, अशी आस होती.
मात्र पाणी पुरवठा नळयोजनेच्या मोटारपंपाचे स्विचरूम नेमके कोणत्या ठिकाणी बांधावे, यासाठी गावकऱ्यांत वाद झाला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात स्विचरूम बांधकाम करण्यासाठी जागा निश्चित करून बांधकामाला सुरूवात झाली. मात्र गावातील काही लोकांनी याला विरोध करीत मंदीर आणि शाळेच्या आवारात बांधकाम होऊ द्यायचे नाही, असा पवित्रा घेतला. याच वादाच्या ठिणगीला राजकीय स्पर्श झाल्याने गावकऱ्यांनी मोटरपंप स्विचरूमसह पाण्याच्या टाकीचे सुरू असलेले बांधकाम बंद पाडले.
गावकऱ्यांच्या हातातोंडाजवळ आलेले पाणी गावकऱ्यांनी गावकऱ्यांच्या वादात दूर पळवून नेल्यामुळे चांगली योजना असूनही गावकऱ्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. हे माथरावासीयांचे दुदैव आहे. माथरा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही.
त्यामुळे या गावाचा कारभार खामोना ग्रामपंचायतीतून चालतो. खामोना गावाला सरपंच तर माथरा गावाला उपसरपंच मिळाला. गाव पातळीवर मिनीमंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाचे दोन लोकप्रतिनिधी दोन गावाला मिळाले. मात्र विकासनिधी खेचून आणण्यात ते अपयशी ठरल्यामुळे गावाच्या विकासकामांना खीळ बसली आहे.
माथरा गावात सदर प्रतिनिधीने फेरफटका मारला असता गावात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शेणखतांचे ढिगारे रस्त्यावर असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर घाण साचते. त्यामुळे गावात विकासकामांचा खेळखंडोबा झाला आहे. (वार्ताहर)