कठोर निर्बंध केवळ नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 05:00 IST2021-03-18T05:00:00+5:302021-03-18T05:00:32+5:30

मागील काही दिवसांमध्ये चंद्रपूर महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. मात्र नागरिक मास्क, सॅनिटायझर तसेच गर्दी टाळताना दिसत नाहीत. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी १६४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  त्यामुळे रुग्णसंख्या वाढीचा आलेख बघता नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांचे दुर्लक्ष होत असून प्रशासनही पाहिजे तेवढे कठोर होताना दिसत नाही.

Strict restrictions only in name | कठोर निर्बंध केवळ नावालाच

कठोर निर्बंध केवळ नावालाच

ठळक मुद्देनियमांची ऐशीतैशी : मनपा हद्दीतील नागरिकांना कोरोनाची धास्ती अजिबात नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शेजारील जिल्ह्यांमध्ये कठोर पावले उचलली जात आहेत. दरम्यान, राज्य सरकारनेही लाॅकडाऊन टाळायचे असेल तर सतर्क राहा, असा  सक्त इशारा दिला आहे. मात्र अद्यापही नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. निर्बंध कठोर आहेत, मात्र शहरात ते केवळ नावालाच असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रशासनाला सक्त होण्याचे आदेश दिले असून त्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन कोरोनासंदर्भात करण्यात येणाऱ्या कारवाईचा आढावा घेतला. एवढेच नाहीतर, लोकप्रतिनिधींना घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरी नागरिक मात्र अजूनही कोरोनाला गंभीरतेने घेण्याचे टाळत आहेत. 
मागील काही दिवसांमध्ये चंद्रपूर महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. मात्र नागरिक मास्क, सॅनिटायझर तसेच गर्दी टाळताना दिसत नाहीत. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी १६४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  त्यामुळे रुग्णसंख्या वाढीचा आलेख बघता नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांचे दुर्लक्ष होत असून प्रशासनही पाहिजे तेवढे कठोर होताना दिसत नाही. त्यामुळेच वाट्टेल तिथे नागरिक गर्दी करीत असून लग्नसमारंभ तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
 

मनपा, महसूल प्रशासन रस्त्यावर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिका तसेच महसूल प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, महापालिकेने २५० नागरिकांवर कारवाई करून १४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला तर महसूल प्रशासनानेही कारवाई सुरू केली आहे. येथील तहसीलदार नीलेश गौंड यांनी स्वत: रस्त्यावर उतरून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविली.

चित्रपटगृहे बंदच
चंद्रपूर शहरात सहा चित्रपटगृहे आहेत. मात्र मागील वर्षभरापासून ती बंदच आहेत. मध्यंतरी प्रशासनाने ५० टक्के उपस्थिती ठेवून चित्रपटगृहे सुरू ठेवण्यासंदर्भात विचारविमर्श सुरू केला होता. मात्र, चित्रपटगृह मालकांना ते परवडणारे नसल्याने आजही चित्रपटगृहे बंदच आहेत. 

विवाहसोहळे उत्साहात
जिल्ह्यात विवाहसोहळे मोठ्या उत्साहात सुरू आहेत. काही ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात असले तरी काही ठिकाणी बिनधास्त कार्यक्रम घेतले जात आहेत. कारवाई टाळण्यासाठी प्रशासनाची परवानगी तेवढी काढली जात आहे. ५० जणांच्या उपस्थितीचे बंधन असतानाही   नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

 

Web Title: Strict restrictions only in name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.