शिवसेनेची एसडीओंकडे मागणी
मूल : तालुक्यात रोज वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. कारण गेल्यावर्षी तालुका प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग योग्य ते नियोजन करून रोखून दाखविला होता. मात्र आताची परीक्षा अधिक कठीण आहे. या आव्हानात्मक घडीला ‘ब्रेक द चेन’ निर्बंधाची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी संपूर्ण मूल तालुक्यात कडक निर्बंध लावल्याशिवाय पर्याय नाही, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केली आहे.
मूल तालुक्यात संसर्ग अधिक वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ शकते. म्हणून कडक निर्बंध आवश्यक आहे. मूल शहरात कुठेही संचारबंदी दिसून येत नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात नियमांची पायमल्ली दिसून येत आहे. कारण मूल शहरात किराणा दुकानांच्या नावाने माॅल राजरोसपणे सुरू आहेत. अत्यावश्यक बाब म्हणजे मूल शहरातील राईस मिलमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात नाही. परराज्यातील मजूर ये-जा करतात. परंतु त्याचे रेकॉर्ड वा चाचणी केली जात नाही. तसे रेकॉर्ड ठेवले जात नाही. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व इतर नियम पाळले जात नाहीत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मूल तालुक्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
बॉक्स
विवाह समारंभ जोमात
मूल शहरात विवाह समारंभ शासकीय नियमानुसार करणे सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात ४०० ते ५०० लोकांमध्ये विवाह समारंभ सुरू आहे. याकडे प्रशासनाने त्वरित निर्देश देऊन त्या गावातील पोलीसपाटील, ग्रामसेवक यांना कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी नितीन येरोजवार यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी उपतालुका प्रमुख रवी शेरकी, शहरप्रमुख राहुल महाजनवार, शहर समन्वयक अरविंद करपे, तालुका संघटक सुनील काळे, महेश चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख संदीप निकुरे उपस्थित होते.