समता व बंधुतेचा आवाज बुलंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:43 IST2016-08-06T00:43:20+5:302016-08-06T00:43:20+5:30
भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्राबल्य वाढत आहे. फॅसिस्ट शक्ती कायदे बदलण्याचे छुपे मनसुबे रचून भारतीय संविधानाला हादरे देऊ लागले आहेत.

समता व बंधुतेचा आवाज बुलंद करा
अभिजित वैद्य : ‘वाढती असहिष्णुता व सामाजिक भाईचारा’वर व्याख्यान
चिमूर : भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्राबल्य वाढत आहे. फॅसिस्ट शक्ती कायदे बदलण्याचे छुपे मनसुबे रचून भारतीय संविधानाला हादरे देऊ लागले आहेत. एकूणच देशात मनुस्मृतीचे राज्य आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता समता व बंधुतेचा विचार बुलंद करावा, असे आवाहन राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी चिमूर येथे केले.
समाजवादी नेते भाई रहेमतुल्ला यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘वाढती असहिष्णुता व सामाजिक भाईचारा’ विषयावर आयोजित व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते.
यावेळी डॉ. वैद्य यांच्या हस्ते स्व. भाई रहेमतुल्ला यांच्या धर्मपत्नी साबेरा बेगम यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजी पाटील डाहुले उपस्थित होते. प्रमुख पाहुणे प्रा. नुतन माळवी, कर्नल चंद्रशेखर रानडे, प्रा. युनूस शेख आदी उपस्थित होते. डॉ. वैद्य म्हणाले की, सध्या राजकारणात व समाजात फॅसिझम वाढत चालला आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याची वारंवार घोषणा देऊन काही धर्मांध लोक समाजात अशांतता निर्माण करू पाहत आहे. त्याच वेळी गरिबांसाठी शिक्षण घेणे महाग झाले आहे. समाजात विषमतेची दरी वाढत चालली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
याप्रसंगी प्रा. नुतन माळवी म्हणाल्या की, भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समता दिली आहे. मात्र सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारला मनुस्मृती व गीता ग्रंथ पुढे आणायचा आहे. हे दोन्ही ग्रंथ विषमता निर्माण करणारे असल्यामुळे या विरोधात संघर्ष करणे आवश्यक आहे.
प्रारंभी वसंतराव कडू गुरुजी व संचाने मंगेश पाडगांवकर यांचे गीत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची वंदना आणि सिंदेवाही येथील कमल बारसागडे व त्यांच्या संचाने स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे स्वागत तालुका अध्यक्ष माधुरी वीर यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इखलाकभाई कुरेशी यांनी केले. संचालन मुस्तकीम पठाण गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी भाई रहेमतुल्ला यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)