पायाभूत सुविधांना बळकट करून न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:21 IST2018-02-16T23:21:20+5:302018-02-16T23:21:53+5:30

कृषी, शिक्षण, आरोग्य, रोजगार या क्षेत्रांमधील पायाभूत सुविधा बळकट करुन सामान्य नागरिकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा.

Strengthen the infrastructure and give justice | पायाभूत सुविधांना बळकट करून न्याय द्या

पायाभूत सुविधांना बळकट करून न्याय द्या

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांची नागपुरात बैठक

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : कृषी, शिक्षण, आरोग्य, रोजगार या क्षेत्रांमधील पायाभूत सुविधा बळकट करुन सामान्य नागरिकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा. वाढीव निधी मंजूर करताना या घटकांना अधिक प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथे सहा जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत केले.
नागपूर आयुक्त कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. यावेळी सहाही जिल्ह्यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१८-१९ च्या ८१६ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे. या सहा जिल्ह्यांनी १ हजार ५०७ कोटी ७४ लाख रुपयाची अतिरिक्त निधीची मागणी केली आहे.
या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा वार्षिक आराखडा, वाढीव मागणी याबाबत जिल्हानिहाय चर्चा करण्यात आली. कृषी, शिक्षण, आरोग्य, रोजगार या चार विषयावर यावेळी लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनांचा उद्देश लक्षात घेऊन आपण सादर केलेल्या वाढीव निधीबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला वित्त व नियोजन मंत्र्यासह राज्यमंत्री दीपक केसरकर, अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवती, विभागीय आयुक्त अनूपकुमार, नियोजन उपसचिव विजयसिंह वसावे, उपायुक्त नियोजन बी. एस. घाटे, आ. नाना श्यामकुळे, आ. बाळू धानोरकर यांच्यासह जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थि होते.
आ. धानोरकर यांनी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती, ट्रॉमा सेंटरची यंत्रसामुग्री व भद्रावती येथील तलावांच्या दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला. तर आ. श्यामकुळे यांनी तीर्थक्षेत्र विकास निधीतून वडा तिर्थक्षेत्र विकसित करण्याची मागणी केली. तर वर्धा नदीवरील खाजगी कंपनीच्या बंधाºयामुळे निर्माण झालेल्या समस्येवर चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या संदर्भात मतदार संघनिहाय बैठका घेण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी केल्या.
हातपंप खोदताना सर्वेक्षणासाठी भूजल विभागाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. जिल्हा परिषदेने सर्वेक्षण तातडीने करण्याबाबत यंत्रणा गतीशील करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. वरोरा तालुक्यातील तुमगाव तलावाच्या प्रलंबित विषयावरही यावेळी चर्चा झाली.
चंद्रपूरला ३२४.३९ कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी
चंद्रपूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेचा आराखडा १६६.७० कोटी रुपयांचा आहे. सन २०१८-१९ साठी ३२४.३९ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मागण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील अंगणवाडी बांधकाम, प्राथमिक शाळा खोली दुरुस्ती या विषयावर चर्चा झाली. जिल्ह्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना ना. मुनगंटीवार यांनी केली.

Web Title: Strengthen the infrastructure and give justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.