रस्त्यावर बाजार अन् गावाला अतिक्रमणाचा आजार
By Admin | Updated: January 27, 2015 23:30 IST2015-01-27T23:30:38+5:302015-01-27T23:30:38+5:30
चंद्रपूर- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अंत्यत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या

रस्त्यावर बाजार अन् गावाला अतिक्रमणाचा आजार
बाबुराव परसावार - सिंदेवाही
चंद्रपूर- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अंत्यत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक समस्या व विकासाची कामे करण्यात आली नाहीत, हे या नगराचे दुर्दैव आहे.
सिंदेवाही हे गाव चंद्रपूर- नागपूर व चिमूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर असून तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने स्थानिक पुढाऱ्याकडून,त्यांच्या कार्यकर्त्याकडून अडचणी, तक्रारी व न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे गावाच्या विकासामाध्ये अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. गावातील अरुंद रस्ते, रस्त्यावर खोलगट खड्डे, कचऱ्याचे ढिग, सांडपाण्याची गैरसोय यामुळे गावात डासांचा उपद्रव वाढला आहे. पावसाळ्यात बाजार चौकातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे रस्त्यावरुन दुचाकी चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. जुन्या बसस्थानकापासून गावात प्रवेश करताना दोन फूट गल्लीतून यावे लागते.
समाज मंदिराची दुर्दशा
सिंदेवाहीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भर घालणारे येथील समाज मंदिर सध्या दुर्दशेत उभे आहे. सिंदेवाही ग्रामपंचायतीने १९८४ मध्ये समाज मंदिर बांधले. त्यानंतर आमदार निधीतून पाच लाख रुपये खर्चून सभागृह व त्यावर शेड बांधण्यात आले. त्यामुळे या समाज मंदिरात सभा, संमेलन, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. सभागृहावरील सिमेंट शेड ठिकठिकाणी तुटलेले असून पावसाळ्यात संपूर्ण सभागृह गळते. व्यासपीठावरील खोलीचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या आहेत, समाज मंदिरात विद्युत व्यवस्था नाही. पूर्वी लग्न समारंभ व नाटकाकरिता समाज मंदिर किरायाने दिल्या जात होते. परंतु व्यवस्था नसल्यामुळे या समाज मंदिरात होणारे कार्यक्रम बंद झाले आहेत.
आठवडी बाजार गैरसोयीचा
दर सोमवारी आठवडी बाजार भरतो या आठवडी बाजाराच्या विकासाची व सुधारण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीची आहे. सध्या रस्त्यावर भरत असलेल्या आठवडी बाजारात अनेक गैरसोयी निर्माण झाल्या आहेत. बाजार रस्त्यावर भरत असल्यामुळे रस्ते रहदारीकरिता अडचणीचे झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाल्याची दुकाने असल्यामुळे ग्राहकांना बाजारात वस्तू व भाजीपाला खरेदी करणे कठीण होवून बसले आहे. आठवडी बाजारासाठी बाजार चौकात जागा होती. परंतु अतिक्रमणामुळे व शॉम्पिंग कॉम्प्लेक्स बांधल्यामुळे आठवडी बाजाराची जागा संपुष्टातत आली. गावातील रस्त्यावर दुकाने थाटलेली असतात.