चिमुरात आठवडी बाजार भरतो रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:16+5:302021-03-09T04:31:16+5:30
चिमूर : चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्वीच्या काळात आठवडी बाजार अस्तित्वात आला. अशाच प्रकारचा आठवडी ...

चिमुरात आठवडी बाजार भरतो रस्त्यावर
चिमूर
: चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्वीच्या काळात आठवडी बाजार अस्तित्वात आला. अशाच प्रकारचा आठवडी बाजार चिमूर शहरात शुक्रवारी भरविण्यात येत आहे.
त्या काळात चिमुरात भरणारा बाजार हा बालाजी मंदिराच्या आवारात रिकाम्या जागेत भरायचा. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा व्याप वाढला. आजघडीला हाच बाजार मुख्य रस्त्यावर भरवण्यात येत आहे. त्यामुळे बाजाराच्या दिवशी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नगरपरिषद अस्तित्वात येवूनही या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
जिल्हास्थळापासून १०० किमी अंतरावर असलेल्या चिमूर शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत १५ ते २० हजारांच्या घरात आहे. चिमूर तालुक्यात ९० ग्रामपंचायतींसह अडीचशे गावांचा समावेश आहे. या गावातील नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी चिमूर शहरात यावे लागते. त्यामुळे रोज या शहरात लाखो रुपयांची उलाढाल होते. नागरिकांच्या गरजेनुसार चिमूर शहरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ अस्तित्वात आली. असे असले तरी अनेक वर्षांपासून आठवडी बाजार रस्त्यावर भरवला जात आहे. मुख्य रस्त्यावर भरवण्यात येणाऱ्या बाजारामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
बॉक्स
बाजाराच्या लिलावातून लाखोंचा फायदा
आठवडी बाजाराच्या वार्षिक लिलावातून स्थानिक प्रशासनाला लाखो रुपयाचा महसूल जमा होतो. मात्र या महसुलातून व्यापाऱ्यांना व बाजारहाट करणाऱ्यांना लाईट, पाणी यासारख्यासुद्धा सुविधा पुरविण्यात येत नाही. त्यामुळे अंधार पडण्याच्या आतच व्यापाऱ्यांना दुकान बंद करावे लागते. मात्र यात महसुलाचा वापर कुठे होतो हा प्रश्न अनेक व्यापाऱ्यांना भेडसावत आहे.
बॉक्स
नगरपालिकेने उपाययोजना कराव्या
नगर परिषदेची निर्मिती होऊन पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र नगरपरिषदेकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र तत्कालीन सरपंच व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील बाजार तलावात भरवण्यास पुढाकार घेतला व बाजार तलावात भरवला. तर नगर परिषदनेसुध्दा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे यार्ड भाड्याने घेऊन बाजार तिथे नेला. पण सुविधा नसल्याने पूर्ववत रोडवर बाजार आला. आता नगर परिषद काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.