लाचखोर ठाणेदाराच्या सुरस कथा नागरिकांच्या चर्चेचा विषय
By Admin | Updated: August 3, 2015 00:40 IST2015-08-03T00:40:45+5:302015-08-03T00:40:45+5:30
चोरीचे गौण खनिज वाहतूक करीत असताना पोलिसांनी पकडलेल्या वाहन मालकाला कारवाईचा धाक दाखवून पैशाची ...

लाचखोर ठाणेदाराच्या सुरस कथा नागरिकांच्या चर्चेचा विषय
कर्त्यव्यदक्ष ठाणेदार द्या : नागरिकांनी केली मागणी
भद्रावती: चोरीचे गौण खनिज वाहतूक करीत असताना पोलिसांनी पकडलेल्या वाहन मालकाला कारवाईचा धाक दाखवून पैशाची मागणी करणाऱ्या ठाणेदारासह वाहतूक शिपायास १ आॅगस्टला लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर ठाणेदाराच्या अनेक लिला सामोर येवू लागल्या आहेत. दरम्यान, न्यायालयाने पोलीस निरीक्षक अशोक साखरकर व अन्य एका आरोपीला जामिन मंजूर केला आहे.
या प्रकरणातील फिर्यादीचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. आपल्या मालकीच्या ट्रॅक्टर आणि हायवा या वाहनांद्वारे तो गौण खनिजांची वाहतूक करीत असतो. त्यातच एकदा त्याचे रेतीने भरलेले ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. सदर ट्रॅक्टर वडिलांच्या नावाने असल्याने तुझ्या वडिलांंना आरोपी करावे लागेल, असे सांगून त्याला धमकाविले. शेवटी तडजोडीनंतर १० हजार रुपये देवून प्रकरण तिथेच संपविले. दुसऱ्यांदा गिट्टीने भरलेला हायवा पकडला. त्यात ३५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून प्रकरण २५ हजारावर निपटविण्याचे ठरले. त्यातील २० हजार रुपये देतांना लाचलूचपत पथकाने ठाणेदार अशोक साखरकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर चौधरी या दोघांना रंगेहात पकडले. या घटनेनंतर ठाणेदाराची अनेक प्रकरणे सामोर आलेत. यावर्षी जिल्ह्यात अनेक रेतीघाटांना शासनाने रेतीचे उत्खनन आणि वाहतुकीसाठी परवानगी दिली नाही. या तालुक्यात जवळपास १५ ते १६ रेतीघाट आहेत. त्यांपैकी फक्त एकच रेती घाटावर रेती उपसा व वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अनेक वाहनधारकांनी रेती चोरीचा मार्ग अवलंबिला. सुरुवातील अशा प्रकारे चोरी करणाऱ्या वाहतूकदारांविरुद्ध पोलीस आणि महसूल विभागाने कारवाईचा धडाका लावला. नंतर हे दोन्ही विभाग शांत झाले. यात दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतुकदारांसोबत आर्थिक तडजोड केल्याची चर्चा आहे. यात प्रती ट्रॅक्टर आठ हजार, हापटन १५ हजार, तर हायवा २५ हजार असा प्रतीमाह दर ठरविल्या गेला. ज्या वाहन मालकांनी ही तडजोड केली नाही, अशांची वाहने पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विश्वासातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सपाटा लावला. यानुसार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण अवैध गौण खनिजाच्या चोरीवर कारवाई करीत असल्याचा भास निर्माण केला. या माध्यमातून दोन्ही विभागाचे हे अधिकारी लाखो रुपयांची माया जमावित होते. त्यातच १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यातून दारूबंदी लागू करण्यात आली. याचा फायदा सुद्धा ठाणेदारांनी घेतला. काही अवैध दारू व्यवसायिकांशी हात मिळवणी करुन त्यातूनही महिन्याला लाखोची माया जमविली.
एकीकडे महसूल विभाग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गुंतला आहे तर दुसरीकडे लाच घेताना ठाणेदार सापडले. याचा फायदा काही वाहतूकदारांना घेतला असून आता त्यांनी गौण खनिजांची राजरोसपणे चोरी करणे सुरू केले आहे. तसेच अवैध दारू व्यवसायिकसुद्धा आता आपल्याला हप्ता द्यावा लागणार नाही, या विचाराने आनंदीत झाले आहेत. या व्यवसायिकांवर अंकुश ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची येथे नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)