विकलांगतेवर मात करुन झुंजणाऱ्या बंडूच्या जिद्दीची कहाणी
By Admin | Updated: December 3, 2015 01:18 IST2015-12-03T01:18:02+5:302015-12-03T01:18:02+5:30
परिस्थिती कितीही बिकट असली तरी आलेल्या परिस्थितीशी दोन हात करीत झुंजायचे. मात्र हार मानायची नाही. प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या ...

विकलांगतेवर मात करुन झुंजणाऱ्या बंडूच्या जिद्दीची कहाणी
शासनदरबारी उपेक्षाच : अपंगांसाठी असलेल्या योजना कागदातच गुंडाळल्या
प्रकाश काळे गोवरी
परिस्थिती कितीही बिकट असली तरी आलेल्या परिस्थितीशी दोन हात करीत झुंजायचे. मात्र हार मानायची नाही. प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर परिस्थितीलाच गुलाम करुन विकलांगतेवर मात करीत आयुष्याच्या खडतर वाटेवरुन सुरु झालेला प्रवास अनेकांच्या काळजालाच छेद करणारा आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील बंडू वाघमारे (४७) यांची कहाणी अनेकांच्या हृदयाला पाझर फोडणारी आहे. घरी अठरा विश्वे दारिद्र्य. जन्मताच हातापायांना अपंगत्व. जन्माला आलेले बाळ सुदृढ असावं ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मात्र बंडूला जन्मताच अपंगत्व आले आणि जन्मदात्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने घरी दोन वेळेच्या जेवणाचे वांधे. शिकण्याची इच्छा मनात असताना घरची परिस्थिती आडवी आली. त्यामुळे जेमतेम शिक्षण पूर्ण केले. वय वाढत गेल्याने पोटापाण्याचा व रोजगाराचा प्रश्न आवासून उभा राहिला. परंतु कुठे रोजगार करावा तर शरीर साथ देत नाही. पाठीशी कुणाचा आधार नाही. आयुष्याची सारी स्वप्न मावळल्यासारखी. मात्र परिस्थितीने जिथे हात टेकले, तेथून बंडूच्या संघर्षाला सुरुवात झाली. सामान्य मानसापेक्षा बंडूची उंची कमी आहे. जन्मताच हातपाय आखूड असल्याने त्याला इतराप्रमाणे काम करता येत नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पोटाची आग त्याने जवळून अनुभवली. मनात काहीतरी नवीन करुन दाखविण्याची धडपड होती. पण शरीर साथ देत नाही. कुणाचा आधार नाही आणि कुठला रोजगार करण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. सारी परिस्थितीच विपरीत आहे. मात्र अशाही परिस्थितीत संघर्षाची वाट त्यांने शोधून काढली.
घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे पोटाचा सवाल बंडूला दिवस-रात्र छळत होता. परंतु त्याला कुणीही काम द्यायला धजावत नव्हते. गावात काम शोधूनही कुणी रोजगार द्यायला तयार नाही. अशाही कठीण परिस्थितीत बंडूने गावाशेजारी असणाऱ्या कोळसा खाणीतील एका ट्रॉन्सपोर्ट कंपनीत काम शोधले. परंतु विकलांगतेमुळे सहा किमी अंतरावर जाण्यायेण्याचा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. सायकलने जावे तर हातपाय आखूड पडतात. परंतु जिद्दीपुढे परिस्थितीला झुकवून मोठ्या हिमतीने हाल, अपेष्टा सहन करीत बंडूने सायकल चालविण्याची कला अवगत केली.
एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करताना सशक्त व्यक्तीलाही चढता उतरताना त्रास होईल. परंतु बंडू ते काम आता सरावाने करीत असल्याचे सांगतो. बंडूकडे शासनाच्या शंभर टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे. शासनाकडून मदत मिळावी यासाठी अनेकदा त्याने शासकीय कार्यालयाचे उंबरडे झिजविले. परंतु त्याच्या पदरी कायम उपेक्षाच आली.
अपंगाना मदत करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. परंतु कर्तव्यात कसूर करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्या योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतत नाही. याउलट बोगस लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे.
समाजात असे अनेक विकलांग बंडू आहेत त्यांची आजही शासन दरबारी उपेक्षाच सुरू आहे. हे त्यांच्या आयुष्याचे धगधगते वास्तव कुणालाही का समजत नाही. हा खरा ज्वलंत प्रश्न शासनाची लक्तरेच वेशीवर टांगणारा आहे.
समाजातील अशा असंख्य विकलांगांना त्यांना हक्काचा अधिकार व लाभ मिळाला तर त्यांच्यासाठी राबविलेल्या योजनांचे खरेच स्वार्थक लाभल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकेल. मात्र विकलांग असूनही परिस्थितीशी झुंजणाऱ्या बंडूसारख्या असंख्य विकलांगांना व त्यांच्या जिद्दीला खरे तर आज सलाम करावा हवा.