वादळी पावसाचा पिकांना तडाखा
By Admin | Updated: May 6, 2015 01:16 IST2015-05-06T01:16:32+5:302015-05-06T01:16:32+5:30
सोमवारच्या रात्री ८ वाजतानंतर जिल्ह्यावासीयांवर निसर्ग कोपल्याचाच अनुभव आला.

वादळी पावसाचा पिकांना तडाखा
चंद्रपूर : सोमवारच्या रात्री ८ वाजतानंतर जिल्ह्यावासीयांवर निसर्ग कोपल्याचाच अनुभव आला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळाच्या तडाख्याने अनेक गावातील विद्युत खांब रस्त्यावर कोसळले तर झाडेही उन्मळून पडली. काही घरांच्या छतावरील पत्रेही उडाल्याने मोठे नुकसान झाले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणनेसाठी प्रगणक गेले होते. पण रात्रीच्यावेळी विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसाने प्रगणकांची चांगलीच भंबेरी उडविली. मूल, सावली, सिंदेवाही, कोरपना, नागभीड, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, भद्रावती आदी तालुक्यातही सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
चंद्रपूर : वादळी पावसामुळे चंद्रपुरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले. घरावरचे टिनाचे पत्रे उडाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. विजेचा सतत लंपडाव सुरू होता. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना घराबाहेर पडावे लागल्याचे चित्र दिसून आले. तर पावसामुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यावर पाणी साचल्याने चिखल पसरले.
कानपा : सोमवारी झालेल्या वादळी पावसाने कानपा येथील विद्युत खांब वाकले. त्यामुळे अनेक विद्युत खांबाच्या तारा तुटल्या. तर झाडे उन्मळून पडली. या वादळामुळे घरांच्या कवेलूचे मोठे नुकसान झाले. तर गावातील अनेकांचे शेतमाल पावसामुळे भिजले. विद्युत खांब कोसळल्याने येथील विद्युतपुरवठा रात्रभर बंद होता.
मूल : सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा वेग महाभंयकर होता. वादळामुळे विद्युत खांब, झाडे रस्त्यावर कोलमडून पडल्याचे मूल तालुक्यातील गावा-गावातत चित्र दिसून आले. वादळामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत मूल शहराबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांनी अंधारातच रात्र काढली.
कोरपना : तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले. वादळामुळे कोरपना व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. काही भागात विद्युत पुरवठा रात्रभर बंद होता. त्यामुळे गावकऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागली.
सिंदेवाही : वादळाचा तडाखा सिंदेवाही तालुक्यालाही बसला. अनेक झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. वरोरा, नागभीड, ब्रह्मपुरी, गोंडपिंपरी, सावली, चिमूर, भद्रावती बल्लारपूर, जिवती आदी तालुक्यातही वादळी पाऊस झाला. (लोकमत चमू)