नुकसान लाखोंच्या घरात : राजुरा, सिंदेवाही, सावली, चिमूर तालुके रात्रभर अंधारातचंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून सोमवारी झालेल्या वादळी पावसाने तर चांगलीच तारांबळ उडाली. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी विद्युत खांबावर झाडे कोसळली. त्यामुळे सोमवारची अख्खी रात्रं अंधारात काढावे लागण्याची पाळी राजुरा, सावली, सिंदेवाही, चिमूर आदी शहरातील नागरिकांवर आली. या वादळाचा सर्वाधिक फटका वीज कंपनीला बसला असून लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती आणि ती खरी ठरली. शनिवारपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. रविवारी घुग्घुस येथे गारपीट झाली. तर सोमवारी ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड, मूल, सावली आदी तालुक्यांना मुसळधार वादळी पावसाने झोडपले. या पावसाचा फटका रबी पिकांना बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज कंपनीलाही या वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. सिंदेवाही शहरात सोमवारी झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणचे विद्युत खांब उन्मळून पडले. तर अनेक खांबावर झाडे कोसळल्याने तारा तुटल्या. परिणामी वीज पुरवठा खंडीत झाला. सावली व राजुरा येथीलही वीज पुरवठा रात्रभर बंद होता. (स्थानिक प्रतिनिधी)दहावीच्या विद्यार्थ्यांना फटकामंगळवारपासून दहावीच्या परिक्षेला प्रारंभ झाला आहे. मात्र सोमवारच्या रात्री वादळी पाऊस झाल्याने याचा फटका विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागला. वादळामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा रात्रभर बंद होता. परिणामी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी दिव्याचा आधार घ्यावा लागला.
वादळाने बत्ती गूल; विद्यार्थ्यांना शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 00:16 IST