महापालिकेचे सर्व कर्मचारी संपावर
By Admin | Updated: December 15, 2015 02:33 IST2015-12-15T02:33:41+5:302015-12-15T02:33:41+5:30
वारंवार मागण्यांच्या पूर्तता करण्याबाबत आयुक्तांना निवेदन देऊनही आयुक्तांनी दखलच न घेतल्याने अखेर

महापालिकेचे सर्व कर्मचारी संपावर
चंद्रपूर : वारंवार मागण्यांच्या पूर्तता करण्याबाबत आयुक्तांना निवेदन देऊनही आयुक्तांनी दखलच न घेतल्याने अखेर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला. सोमवारी एकही कर्मचारी महापालिकेत कामावर रुजू झाला नाही. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. विविध कामासाठी आलेले अनेक नागरिक महापालिकेतून आल्या पावली परत जाताना दिसले.
सदर आंदोलन भारतीय नगरपरिषद कामगार संघाच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. चंद्रपूर शहर महानगरपाालिकेतील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्याबाबत मागील एक वर्षापासून या संघटनेकडून सातत्याने मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मनपा प्रशासनाच्या हेकेखोर धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या १४ मागण्यांपैकी एकही मागणीची प्रशासनाकडून पुर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय नगरपरिषद कामगार संघाच्या नेतृत्वात १४ नोव्हेंबर २०१५ पासून मनपा कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केलेले होते व त्याबाबत मनपा प्रशासनाला कळविलेसुद्धा होते. त्यानंतरही आयुक्तांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. किंवा या संदर्भात साधी चर्चा करण्याचे सौजन्यही दाखविले नाही.
दरम्यान, ३० नोव्हेंबर २०१५ ला संघटनेने मनपा प्रशासनाला रितसर बेमुदत संपाची नोटीस बजावण्यात आली व त्यामध्ये ११ डिसेंबर २०१५ पर्यंत कर्मचाऱ्यांचा मागण्याची पुर्तता न झाल्यास १४ डिसेंबर २०१५ ला शुन्य तासापासून संपूर्ण कर्मचारी बेमुदत संपावर जाणार, असे मनपा प्रशासनाला सूचित करण्यात आलेले होते. ११ डिसेंबर २०१५ पर्यंत मनपा प्रशासनाकडून कोणतीही मागणीची पूर्तता न झाल्यामुळे त्याच दिवशी भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अॅड. शैलेश मुंजे, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिश असरेट यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता द्वारसभा घेण्यात आली. सदर द्वारसभेत कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांची सविस्तर माहिती उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदर द्वारसभेत कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांची सविस्तर माहिती उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदर संपात सतिश असरेट यांनी पाठिंबा दर्शवून सर्व सफाई कामगारांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.वारंवार निवेदन देऊनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याच सकारात्मक हालचाली होत नसल्याने आता मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन तिव्र करण्याची पूर्ण तयारी केलीे.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे आज महानगरपालिकेतील सर्व विभागातील कर्मचारी कामावर रुजू झाले नाही. त्यामुळे महापालिकेतील दैनंदिन कामाचा बोजवारा उङाला. महानगरपालिकेत नेहमीच नागरिकांची विविध कामांसाठी रेलचेल सुरू असते. आज सोमवाहीही अनेक नागरिक विविध कामांसाठी महापालिकेत आले. मात्र कर्मचारीच नसल्याने नागरिकांना आल्यापावलीच परत जावे लागले. आणखी काही दिवस या कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहिल्यास नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच शहर व्यवस्थापनात गैरसोयही निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर महानगर पालिका काय उपाययोलना करणार हे अद्याप कळलेले नाही. (शहर प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
४मनपा कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर जाणार, अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कळताच त्यांनी तात्काळ रविवारी रात्री १० वाजता विश्रामगृहात बैठक बोलाविली. बैठकीला महापौर, आयुक्त, झोन सभापती अंजली घोटेकर, संघटेनेतर्फे सुरेश आंबेकर, तुकड्यादास डुमरे, सारंग निर्मळे, संजय टिकले, भाऊराव सोनटक्के, सचिन माकोडे उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर आयुक्तांनी १४ मागण्यांपैकी पाच मागण्यांची पूर्तता १४ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत करण्याचे आश्वासन दिले. मात्र ६ वाजेपर्यंतही एकही मागणी पूर्ण झाली नव्हती.
महापौरांच्याही सूचनांकडे दुर्लक्ष
४संप मागे घ्यावा, यासाठी महापौर राखी कंचर्लावार व उपमहापौर वसंत देशमुख यांनी आज सोमवारी सायंकाळी ४ वाजता पुन्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले. महापौर व उपमहापौर यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सहानभुतीपूर्वक आजच निकाली काढा, अशा सूचना दिल्या. मात्र आयुक्त त्यांचेही ऐकण्यास तयार नव्हते.
सोमवारी संपाच्या पहिल्या दिवशी १०० टक्के कामगार संपावर होते. मागण्या मान्य न झाल्यास संप बेमुदत सुरू राहील व नागरिकांच्या गैरसोयीबद्दल स्वत: आयुक्त जबाबदार असतील.
- शैलेश मुंजे, जिल्हाध्यक्ष, भारतीय नगरपरिषद कामगार संघ, चंद्रपूर