कंत्राटी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन

By Admin | Updated: May 23, 2017 00:29 IST2017-05-23T00:29:38+5:302017-05-23T00:29:38+5:30

चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीने विविध मागण्याच्या पूर्ततेकरिता सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

Stop the untimely work of contract workers | कंत्राटी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन

कंत्राटी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन

मागण्यांची पूर्तता करा : वीज निर्मितीवर परिणामाची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर: चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीने विविध मागण्याच्या पूर्ततेकरिता सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे वीज निर्मिती प्रभावित होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात वीज कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त विविध कामे कंत्राटदारामार्फ त केली जातात. अशा कंत्राटदारांकडे शेकडो कामगार कार्यरत आहेत. कंत्राटदार कामगारांना राबवून मेहनतीचे कामे करवून घेतात. त्या तुलनेत त्यांना वेतन आणि सोईसुविधा पुरविल्या जात नाही. त्यांचे शोषण केले जाते. याबाबत कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याशिवाय रानडे कमीटीने सदर केलेल्या पगार वाढीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, बंद केलेल्या कामगारांच्या कामाची पर्यायी व्यवस्था करावी, पोलीस पडताळणीच्या नावावर कंत्राटी कामगारांना बंद करण्याचे कारस्थान थांबवावे, केंद्र सरकारच्या राजपत्रानुसार सात हजार रूपये बोनस देण्याचे प्रावधान होते. मात्र प्रत्यक्ष ३५०० बोनस देऊन उर्वरित बोनसची कपात करण्यात आली आहे. अशा कंत्राटदारावर कार्यवाही करून कपात केलेली रक्कम परत देण्यात यावी, कंत्राटी कामगारांना मेडीकल सुविधा पुरविण्यात यावी, कामगारांना किमान वेतनासह भत्ते, वेतनस्लिप द्यावी व जे कंत्राटदार कर्मचाऱ्यांचे वेतन बँकेत जमा करीत नाही, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. अशा मागण्याच्या पूर्तेतेकरिता ८ व ९ मे रोजी आंदोलन करण्यात आले. मात्र सदर मागण्या मान्य न झाल्याने आज सोमवारपासून वीज निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीद्वारे बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
शेकडो कामगारांनी कामावर न जाता आपला रोष व्यक्त केला. यात सिटूचे अध्यक्ष वामन बुटले, इंटकच्या निताई घोष, शंकर वागेसर, बी.एम.एस.चे सचिव विकास ऊदबले, कामगार सेनेचे सचिव भीमप्रकाश उराडे यांचा सहभाग आहे.

२३०० मेगावॅट वीज निर्मिती
कंत्राटी कामगारांच्या संपाचा वीज निर्मितीवर परिणाम पडला नसून आज सोमवारी २३०० मेगॉवॅट निर्मितीसुध्दा घेतली, अशी माहिती चंद्रपूर वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Stop the untimely work of contract workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.