नगरपरिषदेच्या विरोधात बाम्हणी येथे रास्ता रोको

By Admin | Updated: April 13, 2016 01:16 IST2016-04-13T01:16:51+5:302016-04-13T01:16:51+5:30

नागभीड नगरपरिषदेत समावेश केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बाम्हणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the path against the municipality in Bamhani | नगरपरिषदेच्या विरोधात बाम्हणी येथे रास्ता रोको

नगरपरिषदेच्या विरोधात बाम्हणी येथे रास्ता रोको

नागरिकांत रोष : बाम्हणी, डोंगरगाव, नवखळा, भिकेश्वरचा विरोध
नागभीड: नागभीड नगरपरिषदेत समावेश केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बाम्हणी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात इतर समाविष्ट गावांनीही सहभाग घेतला. दरम्यान, भिकेश्वर येथील शेकडो नागरिकांनी येथील तहसीलदारांना निवेदन देवून आमचे गाव नगरपरिषदेतून वगळा अशी मागणी केली.
सोमवारी नगरविकास विभागाने एक अधिसूचना प्रसिद्ध करुन नागभीडला नगरपरिषदेचा दर्जा बहाल केला. या प्रस्तावित नगरपरिषदेत नागभीड नवखडा, सुलेझरी, तिवर्ला गावगन्ना,तिवर्ला तुकूम, बाम्हणी, बोथली, चिखलपरसोडी, खैरी चक पारखी भिकेश्वर डोंगरगाव व चिचोली खुर्द या गावांचा समावेश राहील. असेही या अधिसूचनेत म्हटले आहे. ही अधिसूचना जाहीर होताच काही गावात असंतोष निर्माण झाला.
या असंतोषाचे पर्यावसान मंगळवारी बाम्हणी येथे दिसून आले. नवखळा, बाम्हणी बोथली आणि डोंगरगाव येथील लोक शासनाच्या या निर्णयाविरोधात एकत्र आले आणि रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास अर्धा तास हे रास्ता रोको आंदोलन चालले. या आंदोलनाची नागभीडचे तहसीलदार समीर मानेयांनी दखल घेत आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. दरम्यान नागभीड नगरपरिषदेत समावेश करण्यात आलेल्या भिकेश्वर येथील शेकडो नागरीकांनी तहसील कार्यालयात येवून नगरपरिषदेतून आमचे गाव वगळा या मागणीचे निवेदन दिले. (तालुका प्रतिनिधी)

माझा नगरपरिषदेला विरोध नाही. पण ग्रामीण जनतेच्या मानसिकतेचा विचार करुन हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. नागभीडच्या विकासासाठी ग्रामपंचायतही सक्षम होती. या निर्णयाने ग्रामीण भागाच्या अडचणी वाढणार आहेत. योग्य पदाधिकारी मिळाले तर ग्रामपंचायतही नगरपरिषदेपेक्षा जास्त विकास करु शकते. हे बाम्हणी, सुलेझरी, भिकेश्वर नवखळा येथील ग्रामपंचायतींनी सिद्ध केले आहे.
- प्रफुल्ल खापर्डे, माजी सभापती जि.प. चंद्रपूर

निर्माण झालेले वातावरण लक्षात घेऊन बाम्हणी येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणेदार बी.डी. मडावी स्वत: बाम्हणी येथे हजर होते. एवढेच नाही तर ज्या गावांना नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आला आहे त्या गावातही पोलीस तैनात करण्यात आले होते.
नागभीड व इतर समाविष्ट गावांचे प्रशासक म्हणून नागभीडचे तहसीलदार समीर माने यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.

Web Title: Stop the path against the municipality in Bamhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.