गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत अजूनही संभ्रम
By Admin | Updated: April 26, 2015 01:46 IST2015-04-26T01:46:02+5:302015-04-26T01:46:02+5:30
गेल्या १७ एप्रिलला रात्रीच्या सुमारास घडलेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत अजूनही संभ्रम
गडचांदूर : गेल्या १७ एप्रिलला रात्रीच्या सुमारास घडलेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या प्रकरणात कोणाचा हात आहे, याबाबत अजूनही पोलीस व नागरिकांत संभ्रम आहे. पोलीस सूत्रधारापर्यंत पोहचू न शकल्यामुळे डोहे कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते तथा गडचांदूरच्या नगरसेविका विजयालक्ष्मी डोहे यांचे पती अरविंद डोहे यांच्या घरी गोळीबार करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी विक्की दुसाने याला अटक केली होती. त्याच्याजवळून पिस्तोलही जप्त करण्यात आले होते. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. घुग्घुस येथील हाजी टोळीशी संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र या प्रकरणातील दुचाकीवर असणाऱ्या दुसऱ्या आरोपीपर्यंतही पोलिसांना पोहचता आले नाही. एवढेच नाही तर गोळीबारात वापरण्यात आलेल्या दुचाकीचाही शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
आरोपीपर्यंत पोहचता यावे, यासाठी गडचांदूर पोलिसांनी आरोपीला पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने एमसीआर दिल्याने पोलिसांना तपास करण्यात मोठी अडचण निर्माण झाली. यामागील खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांची धडपड सुरु आहे. या घटनेमुळे गडचांदुरातील दहशत अजूनही कायम आहे. (शहर प्रतिनिधी)