पटेलांनी उचलले पाऊल; निजाम स्टेट भारतात विलीन

By Admin | Updated: October 31, 2015 01:59 IST2015-10-31T01:59:28+5:302015-10-31T01:59:28+5:30

भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यपूर्व वा त्यानंतर बल्लारपूर-चंद्रपूर या भागात येऊन गेले, ...

Step taken by pallet; Nizam State merged in India | पटेलांनी उचलले पाऊल; निजाम स्टेट भारतात विलीन

पटेलांनी उचलले पाऊल; निजाम स्टेट भारतात विलीन

वर्धा नदीच्या दुधोली रेल्वे पुलावर : झाली होती युद्ध सदृष्य कारवाई
वसंत खेडेकर बल्लारपूर
भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यपूर्व वा त्यानंतर बल्लारपूर-चंद्रपूर या भागात येऊन गेले, वा नाही, हे माहित नाही. पण, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील विखरुन असलेल्या सर्वच लहान मोठ्या संस्थानिकांना भारतात विलीन करून अखंड भारत करण्याकरीता त्यांनी उघडलेल्या मोहिमेला प्रतिसाद न देणाऱ्या हैदराबादच्या निजामाविरुद्ध कारवाई करण्याचा त्यांनी दिलेला कठोर आणि निर्णायक आदेश या भागात अमलात आला. गृहमंत्रालयाने केलेली बल्लारपूर जवळील वर्धा नदीवरील दुधोली रेल्वे पुलावरील पोलीस अ‍ॅक्शन यशस्वी झाली आणि निजाम स्टेट भारतात विलीन झाले. त्यामसयी भारत आणि निजाम स्टेटच्या सीमावर्ती भागात काय म्हणून आनंद झाला! त्याचे वर्णन तो आनंद बघणारे, प्रत्यक्ष अनुभव घेणारे सांगतात.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजाम स्टेट भारताशी तुटून होता. निजाम आपल्या स्टेटला भारताचा भाग मानतच नव्हता. त्याचा विचार स्वतंत्र राहायचे वा आपल्या स्टेटला पाकिस्तानशी जोडायचे, असा होता. यामुळे निजाम स्टेट आणि भारत ही दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत, असा व्यवहार या दोहोंच्या सीमेवर चालायचा. वर्धा नदीच्या अलिकडील बल्लारपूर हे शहर भारतात, तर नदीपलीकडील राजुरा हे निजाम स्टेटमध्ये अशी स्थिती होती. निजाम आणि भारताला वाहतुकीने जोडणारा विदर्भ भागात दुधोली हा रेल्वे पूल होता. दोनही भागात वेगवेगळ्या देशांप्रमाणे सीमेवर गाड्यांची तपासणी व्हायची. नियामावर त्याचे विलीनीकरण भारतात करण्याची कारवाई होण्याच्या काही दिवसांपूर्वी पासून भारतीय सैन्यानी जमवाजमव बल्लारपूर आणि दुधोली पुलाजवळ नदीकाठी झाली. सैन्य छावणी उभारली गेली होती. पावसाचे दिवस असल्याने नदीचे पाणी पिण्या योग्य नव्हते. त्यामुळे जवानांकरिता बल्लारशाह रेल्वे स्थानकावरुन गाडीने पाणी पोहचविले जायचे. सप्टेंबरचा महिना, गणेशोत्सव सुरू होता. निजामाविरुद्ध पोलीस कारवाई (पोलीस अ‍ॅक्शन असे या कारवाईचे नाव) करण्याचा निर्णय झाला. निजामाकडे रजाकार नावाचे सैन्य होते. त्यांनी सीमावर्ती भागात बराच उत्पाद मांडला होता. ते सीमेवर पहारा देत. कारवाईच्या दिनी रेल्वे पुलावर रेल्वे मालगाडीचा आडोसा घेत भारतीय जवानांनी चाल करायचे असे ठरले.
त्यानुसार मालगाडीच्या चाकांसह भारतीय जवान पुलावरुन निजामच्या दिशेने हळूहळू सरकू लागले. ही बाब पलिकडील रजाकारांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीच्या इंजीनच्या दिशेने गोळ्या झाडणे सुरू केले. या गोळ्यांच्या माऱ्याने गाडीचा ड्रायव्हर घाबरला आणि विचलीत होऊन गाडी मागे घेऊ लागला. ही बाब लक्षात येताच दुसऱ्या ड्रायव्हरने त्याला बाजून करुन इंजीनचा ताबा घेतला आणि मोठ्या हिंमतीने रजाकारांच्या फैरी समोरुन सुरू असतानाही इंजीनला पुढे नेते. पूल पार केल्यानंतर व निजामाच्या हद्दीत पोहचल्यानंतर भारतीय जवान रजाकांवर तुटून पडले आणि पुढे पुढे सरकत जात मोहिम यशस्वी झाली. अशाप्रकारे निजाम भारतात विलीन झाले. सरदार पटेल यांचे कठोर पाऊल उचलून निजामला भारतात विलीन केले. तसे झाले नसते तर बल्लारपूर- राजुरा भागात वेगळीच स्थिती राहिली असती. म्हणूनच सरदार पटेल यांचे आभार मानावे तेवढे कमीच !

Web Title: Step taken by pallet; Nizam State merged in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.