भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा पूर्ववत स्थापन होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST2021-03-16T04:29:33+5:302021-03-16T04:29:33+5:30
चंद्रपूर : शहीद भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापन करावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सोमवारी ...

भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा पूर्ववत स्थापन होणार!
चंद्रपूर : शहीद भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापन करावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सोमवारी आदिवासी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनीही सकारात्मक चर्चा करून लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी क्रांतिवीर नारायणसिंह उईके, आदिवासी विकास संस्थेचे अशोक तुमराम, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, रंजना किन्नाके, वैशाली मेश्राम, प्रदीप गेडाम, प्रीती पेंदोर, जितेंद्र बोरकुटे, जमुना तुमराम उपस्थित होते. शहीद बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहेत. चंद्रपुरातील आदिवासी संघटना व समाज बांधवांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून रेल्वे स्थानकाजवळ शहीद बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारला होता; परंतु चंद्रपूर मनपा प्रशासनाने अत्यंत निर्दयीपणे क्रेनच्या सहाय्याने महापुरुषांचा पुतळा हटविला. त्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष आहे. प्रशासनाचा निषेध म्हणून सत्याग्रहही सुरू आहे. दरम्यान, आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आदिवासी नेत्यांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्याशी चर्चा करून हा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापन करण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली.
मनपाने पुढाकार घेतल्यास निधी देणार
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तेजस्वी योगदान दिलेल्या भगवान शहीद बिरसा मुंडा हे लोकांच्या मनात आहेत. महापुरुषांची विटंबना करणे योग्य नाही. चंद्रपूर मनपाने या महापुरुषांचा पुतळा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी निधीची आवश्यकता असल्यास देऊ, अशी ग्वाही आमदार जोरगेवार यांनी चर्चेदरम्यान दिली.