महिलांच्या प्रयत्नांतून साकारला गाडगेबाबांचा पुतळा

By Admin | Updated: March 8, 2016 00:40 IST2016-03-08T00:40:02+5:302016-03-08T00:40:02+5:30

गावात सगळेच शेतकरी, मजूर. यातही एकमेकांच्या कामाला धावून जाण्याची त्यांची नेहमीचीच सहकार्याची भावना.

The statue of Gadgebaba is inspired by the efforts of women | महिलांच्या प्रयत्नांतून साकारला गाडगेबाबांचा पुतळा

महिलांच्या प्रयत्नांतून साकारला गाडगेबाबांचा पुतळा

गावात उभारले वाचनालय : पथनाट्यातून समाजप्रबोधन

महिला दिन विशेष
रत्नाकर चटप  नांदाफाटा
गावात सगळेच शेतकरी, मजूर. यातही एकमेकांच्या कामाला धावून जाण्याची त्यांची नेहमीचीच सहकार्याची भावना. गावात राष्ट्रसंत तुकडोजी महराजांची नित्याची सामुदायिक प्रार्थना आणि याच ग्रामगीतेतून येथील महिलांना समाजप्रबोधनाची प्रेरणा मिळाली. कोरपना तालुक्यातील बाखर्डी गावातील ४० महिलांनी एकत्र येऊन गेल्या ८ मार्च रोजी कलापथकाची स्थापना केली. काही गावातून इच्छुकांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून या महिलांनी गाडगेबाबांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावे, यासाठी गावातील मुख्य चौकात कर्मयोगी गाडगेबाबांचा आकर्षक पुतळा उभारला आहे.
गावागावांत जाऊन कलापथक सादर करायचे. शेतकरी आत्महत्या, भ्रूणहत्या, हुंडाबळी, अंधश्रद्धा, बालविवाह, आरोग्यविषयक समस्या, व्यसनमुक्ती आदी २१ विषयांवर तीन तासाचे पथनाट्य या महिला आजही सादर करीत आहे. वर्षभरात ३० हून अधिक गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश महिला कलाकार या अशिक्षित तर काहींचे शिक्षण केवळ चौथीपर्यंतच झाले आहे. अशाही परिस्थितीत त्यांच्या अभिनयाने सारेच कौतुकाची थाप देतात. एकही पुरुष नसलेल्या त्यांच्या नाटकात स्त्रियाच पुरुषांचा अभिनय सादर करुन वास्तविक परिस्थितीची जाण करुन देत आहे. या महिलांनी आता नारीशक्ती जनजागृती मंडळ स्थापन केले आहे. गावात दर शनिवारी ग्रामस्वच्छता करुन महिला गाव स्वच्छ करीत आहे. ही परंपरा गेल्या अनेक दिवसापासून आजही सुरु आहे. गावातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे दरवर्षी मे महिन्यात बालसुसंस्कार शिबिराचे गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रधर्म प्रचार समिती कोरपनाच्या वतीने आयोजन केल्या जाते. यातही या महिला नि:शुल्क योगदान देतात. गावात पथनाट्य सादर केल्यानंतर आर्थिक मदतीतून मिळालेल्या पैशातून आता वाचनालय उभारले आहे. यामुळे गावातील लहान मुले व युवकांना वाचनाची गोडी निर्माण होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. याचबरोबर बचत गट, सामाजिक संस्थाच्या माध्यमातून कुटीर व लघुउद्योगाला चालना देऊन गावातच रोजगार मिळेल, यासाठी आता महिला प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

Web Title: The statue of Gadgebaba is inspired by the efforts of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.