ग्रामपंचायतीच्या विरोधात ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: March 15, 2015 00:57 IST2015-03-15T00:57:35+5:302015-03-15T00:57:35+5:30
येथील ग्राम पंचायतमधील बेजबाबदार पदाधिकाऱ्यांमुळे नागरिकांना मुलभूत गरजेपैकी एक अशा पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ग्रामपंचायतीच्या विरोधात ठिय्या आंदोलन
गोंडपिपरी : येथील ग्राम पंचायतमधील बेजबाबदार पदाधिकाऱ्यांमुळे नागरिकांना मुलभूत गरजेपैकी एक अशा पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात एल्गार पुकारत १५ मार्च रोजी स्थानिक गांधी चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या महिन्यातच येथील ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे विद्युत देयक अदा न केल्याने येथील नागरिकांना पाणी समस्येला सामोर जावे लागले तर येथीलच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरी समस्या उचलून धरत ग्रामपंचायतीच्या विरोधात गटविकास अधिकाऱ्यांकडेही तक्रार नोंदविली होती. मात्र चालू महिन्यात राज्य विद्युत पुरवठा कंपनीचे वीज बिल थकीत पडल्याने पुन्हा एकदा शहरात पाणी पेटले आहे. सदर गंभीर प्रकाराला येथील सरपंच सुनील डोंगरे व ग्रामविकास अधिकारी दिलीप शिंदे यांनाच प्रमुख जबाबदार मानत येथील नागरिकांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. उद्या गांधी चौकात होणारे ठिय्या आंदोलन व शांततापूर्ण सत्याग्रहात जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गणेश डहाळे, संजय झाडे, अश्विन कुसवाके, विनोद वाघाडे, विनोद चौधरी, प्रवीण झाडे यांनी पत्रकातून केले आहे. (तालुका प्रतिनिधी)