मुनगंटीवारांचे ‘ते’ वक्तव्य लोकशाहीला मारक
By Admin | Updated: January 24, 2015 22:52 IST2015-01-24T22:52:17+5:302015-01-24T22:52:17+5:30
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांबद्दल जाहीर वक्तव्य केले, ते लोकशाहीतील लोकप्रतिनिधीला न शोभणारे आहे. घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर

मुनगंटीवारांचे ‘ते’ वक्तव्य लोकशाहीला मारक
पत्रकार परिषद : राजू गैनवार यांचा आरोप
भद्रावती : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांबद्दल जाहीर वक्तव्य केले, ते लोकशाहीतील लोकप्रतिनिधीला न शोभणारे आहे. घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून लोकशाही मार्गाने दारू विक्रेत्यांकडून त्यांना काळे झंडे दाखवून शांततेच्या मार्गाने त्यांनी निषेध नोंदविला. हा लोकशाहीतील प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु या प्रकारे निषेध नोंदविल्याबद्दल मुनगंटीवार यांनी एकाधिकारशाहीची जी भाषा वापरली ती लोकशाहीला शोभणारी नसल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव तथा नगरपालिकेचे नगरसेवक राजू गैनवार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात जी दारूबंदी घोषीत केली, ती अभिनंदनीय बाब आहे. दारूमुळे जिल्ह्यातील असंख्य महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक महिला विधवा झाल्या आहेत. ही बाब सत्य आहे. परंतु हा निकष संपूर्ण राज्यालाच लागू होतो. त्यामुळे ना. मुनगंटीवार यांनी संपूर्ण राज्यातील जनतेचा विचार करून जर राज्यातच दारूबंदी केली असती तर ते एका अर्थाने राज्याच्या रयतेचे राजे ठरले असते. परंतु ना. मुनगंटीवारांनी फक्त आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करून एक प्रकारे आपल्या स्वार्थीपणाचे दर्शन घडविल्याचा आरोप गैणवार यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी याकडे लक्ष देऊन जनतेला निर्भयतेने जगता येईल आणि आपले न्यायीक हक्क मागता येईल, याकडे लक्ष घालावे अशी मागणी राजू गैणवार यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला मुकेश पतरंगे, नाना चटपल्लीवार, सागर बेले, संतोष बोमिडवार, अंकुश जवळे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)