केबलच्या खोदकामामुळे राज्य मार्गाची दुरवस्था
By Admin | Updated: June 17, 2015 01:56 IST2015-06-17T01:56:47+5:302015-06-17T01:56:47+5:30
मागील आठ दिवसांपासून बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्ग दरम्यान केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला

केबलच्या खोदकामामुळे राज्य मार्गाची दुरवस्था
बल्लारपूर : मागील आठ दिवसांपासून बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्ग दरम्यान केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम सुरू आहे. यामुळे राज्य महामार्गाची दुरवस्था होत असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बल्लारपूर शहरातील रस्त्याच्या बाजुला खड्डे निर्माण झाले असून अपघाताची शक्यता बळावली आहे. वनविभागाच्या झाडाची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रमापासून गोंडपिपरीपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने चंद्रपूर येथील आर.आर. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून एअरटेल कंपनीच्या भूमीगत केबल लाईनसाठी खोदकाम केले जात आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र खोदकाम करण्यासाठी पूर्व परवानगी घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. परिणामी चौपदरी रस्त्याच्या एका बाजूला खड्डे निर्माण झाले आहेत. बल्लारपूर शहरात तर ऐन रस्त्यावर खोदकाम केले जात आहे. परिणामी रस्त्याच्या बाजूला असणारे व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले आहेत.
बामणी (दुधोली) ते चंद्रपूर दरम्यान मार्गाचे चौपदीरकरण करण्यात आले. या मार्गावर एकेरी वाहतूक सहा महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली. अशातच केबलच्या खोदकामामुळे चांगल्या मार्गाचे विद्रुपीकरण करण्याचे धोरण केबल व्यवस्थापनाकडून केले जात आहे. परिणामी शहरातील मार्गावर खड्डे निर्माण होऊन ऐन पावसाळ्याच्या दिवसात अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावर बहुतेक ठिकाणी जंगलव्याप्त भाग आहे. वृक्षाचे जतन करणे महत्त्वाचे असूनही केबलच्या खोदकामासाठी रस्त्यालगतच्या झाडाची सर्रास कत्तल केल्याचे दिसून येते.
दूरसंचार सेवा कार्यान्वित होणे गरजेचे आहे. मात्र यासाठी वनविभागाला व सार्वजनिक बांधकाम विभागालाच एअरटेल कंपनीच्या व्यवस्थापनाने वेठीस धरल्याचे दिसते. यामुळे केबलच्या अनाधिकृत खोदकामाकडे वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱ्यांचे खोदकामावर नियंत्रण नसल्याने संबंधित कंत्राटदार नियमाला डावलून काम करीत आहे. केबलच्या खोदकामामुळे प्राणहाणी झाल्यास जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. सदर खोदकामाला अनाधिकृतपणे संमती देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावर संबंधित प्रशासन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)
वाहतुकीस अडथळा
४रस्त्याच्या लगत केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यालगतची माती डांबरीकणावर पसरत आहे. त्यामुळे रस्त्यावर बारीक माती साचून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.