आजपासून महाकाली यात्रेला प्रारंभ
By Admin | Updated: April 12, 2016 03:29 IST2016-04-12T03:29:38+5:302016-04-12T03:29:38+5:30
जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या यात्रेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. महाकाले परिवार

आजपासून महाकाली यात्रेला प्रारंभ
चंद्रपूर : जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या यात्रेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. महाकाले परिवार आणि बाराही महिने देवीच्या नतमस्तकी होणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत देवीची पूजा करण्यात येणार आहे.
जिल्ह्याचे आराध्यदैवत देवी महाकाली आहे. एप्रिल महिन्यात दरवर्षी मोठी यात्रा येथे भरते. यात्रा कालावधीत देवीचे दर्शन घेण्यासाठी नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापुर आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. येथील ऐतिहासिक जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट येथे नारळ फोडून देवी महाकालीच्या नावाचा गजर करीत भाविक मंदिराकडे रवाना होतात. गुडीपाडव्यापासूनच भाविकांचे लोंढे चंद्रपुरात दाखल होत आहे. सध्या भाविकांची संख्या कमी असली तरी १५ एप्रिलपासून ती वाढणार आहे.
मंगळवारी पहाटे माता महाकालीची पूजा करण्यात येणार आहे. यावेळी देवीला अलंकारही परिधान करण्यात येतील. महिनाभर म्हणजे अक्षय्यतृतीयेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर हारफुलांसह पूजेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत.
यात्रेची सुरुवात गोंडराजाची महाराणी हिराई यांनी १७१४ रोजी केली. आजही यात्रेची ख्याती दूरदूरपर्यंत आहे. यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. (प्रतिनिधी)
४०० होमगार्डसह पोलिसांचा पहारा
४यात्रेदरम्यान हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर यात्रेदरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. येत्या १७ एप्रिपर्यंत २०० पुरूष होमगार्ड, २०० महिला होमगार्डसह शहर पोलिसांचा ताफा यात्रा परिसरात तैनात राहणार आहे. १७ तारखेनंतर बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे.
गोंडराजे वीरेंद्रशहा यांच्या हस्ते पूजा
४दरवर्षीप्रमाणे उद्या मंगळवारी दुपारी १२ वाजता महाकाली यात्रेच्या शुभारंभ दिनी आराध्य दैवत माता महाकालीची पूजा गोंडी पद्धतीने चंद्रपूर चंद्रपूरचे गोंडराजे वीरेंद्रशहा आत्राम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राजे वीरेंद्रशहा आत्राम यांच्या समाधी वॉर्डातील वाड्यातून गोंडी नृत्य व गोंडी वाद्यासह वाजतगाजत मिरवणूक निघेल. यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे.