आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ
By Admin | Updated: March 22, 2017 00:50 IST2017-03-22T00:50:47+5:302017-03-22T00:50:47+5:30
जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदाच्या ७२ जागांसाठी २२ मार्च बुधवारपासून जिल्हा पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रियेला प्रारंभ होत आहे.

आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ
पोलीस मुख्यालयात चाचणी : ७२ जागांसाठी १५ हजार उमेदवार, पोलीस विभागाकडून चोख व्यवस्था
चंद्रपूर : जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदाच्या ७२ जागांसाठी २२ मार्च बुधवारपासून जिल्हा पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. ७२ जागांसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून १५ हजार ९६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी मंगळवारी पोलीस भरती मैदानावर स्वत: सर्व व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी यावेळी मैदानात ठिकठिकाणी लावण्यात आलेले व्हिडीओ कॅमेरे आणि त्याच्या चित्रीकरणाचा आढावा घेतला. बुधवारपासून भरती प्रक्रियेच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशिवाय अन्य लोकांना प्रवेश बंदी राहणार आहे.
ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी राहावी यासाठी पोलीस दलात नातेवाईक असणाऱ्या अधिकाऱ्यांना भरती प्रक्रियेपासून दूर ठेवण्यापासून परीक्षेच्या सर्व प्रक्रियाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्य गुप्त वार्ता व लाचलूचपत प्रतिबंधक विभागास लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहे. अपात्र उमेदवारांना काही शंका असल्यास तत्काळ अपिलची सोय केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
कागदपत्रांची पडताळणी सर्वात शेवटी
७२ जागेकरीता अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार एकूण १५ हजार ९६२ उमेदवारांनी अर्ज सादर केलेले असून त्यापैकी ३ हजार ४२२ महिला उमेदवार तर १२ हजार ५४० हे पुरुष उमेदवार आहेत. आधी शारिरीक मोजमाप त्यानंतर मैदानी चाचणी व शेवटी लेखी चाचणी असे या भरती प्रक्रियेचे स्वरुप असणार आहेत. या भरतीमधील एक विशेष असे की, उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी ही सर्वात शेवटी करण्यात येणार आहे. त्यामुळे कागदपत्राच्या पडताळणी करीता उमेदवारांना बराच वेळ रांगेत उभे राहून ताटकळत बसण्यापासून दिलासा मिळणार आहे. तसेच जे उमेदवार वेळेअभावी काही महत्वाचे कागदपत्र उपलब्ध करुन देण्यास असमर्थ ठरतात. त्यांना सुध्दा आपले कागदपत्र सादर करण्यास पुरेसा अवधी प्राप्त होणार आहे.
सकाळीच होणार मैदानी चाचणी
अत्यंत पारदर्शी व शिस्तीमध्ये ही भरती प्रक्रिया राबवितानाच उमेदवारांची गैरसोय सुध्दा होऊ नये याकडे सुध्दा बारकाईने लक्ष पुरविण्यात आले आहे. उन्हाळयाचे दिवस असल्याने मैदानी चाचणी ही शक्यतो एकाच दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जेणेकरुन लांबून आलेल्या उमेदवार हे त्याच दिवशी आपल्या घरी परत जाऊ शकतील व शहरात कुठे थांबावे, या प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागणार नाही. ज्या ट्रॅकवर उमेदवार १६०० मीटर करीता धावणार आहेत, त्या ट्रॅकची संपूर्ण डागडुजी करण्यात आली आहे.