नगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून प्रक्रिया सुरू
By Admin | Updated: October 24, 2016 00:52 IST2016-10-24T00:52:11+5:302016-10-24T00:52:11+5:30
राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून २४ आॅक्टोंबरपासून या प्रक्रियेला प्रारंभ होत आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून प्रक्रिया सुरू
चार नगरपरिषद, एक नगरपंचायत : निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून २४ आॅक्टोंबरपासून या प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील वरोरा, राजुरा, बल्लारपूर व मूल या चार नगरपालिकांसाठी व सिंदेवाही या नगरपंचायतीसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीमध्ये संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र व शपथपत्रे स्वीकारण्यात येणार असून विहित मुदतीत नामनिर्देशनाची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावे लागणार आहे. आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोच जोडावी व निवडून आल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
निवडणूक कालावधीत नगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने नागरिक व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, तसेच नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हास्तरावर तक्रार निवारण केंद्र
मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर तक्रार निवारण केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच व्ही.एस.टी. चेकपोस्ट पथक व भरारी पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत. नामनिर्देशनपत्राची छाणनी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे २ नोव्हेंबर, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर, मतदान २७ नोव्हेंबर सकाळी ७.३० ते सायं. ५.३० पर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर २८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजतापासून.