गोंडपिंपरी येथे वनोद्यान निर्मितीला प्रारंभ
By Admin | Updated: June 23, 2016 00:41 IST2016-06-23T00:41:00+5:302016-06-23T00:41:00+5:30
जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिंपरी तालुका हा वनसंपदेने नटलेला आहे. मात्र वनविभाग व वनविकास महामंडळाच्या वतीने आजवर वनसंपदेसह, ...

गोंडपिंपरी येथे वनोद्यान निर्मितीला प्रारंभ
युवकांच्या प्रयत्नांना यश : पाठपुराव्याचे फलित
गोंडपिंपरी : जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिंपरी तालुका हा वनसंपदेने नटलेला आहे. मात्र वनविभाग व वनविकास महामंडळाच्या वतीने आजवर वनसंपदेसह, वन्यजीव सुरक्षेबाबत नागरिकांशी मेळ घालण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले नाही. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वनोद्यान निर्मितीबाबत सतत पाठपुरावा करणाऱ्या युवकांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. येथे वनोधान निर्मितीच्या कामास प्रारंभ झाला आहे.
ग्राम खेड्यातील युवकांना वनसंपदा व वन्यजीव सुरक्षा काळाची गरज, पर्यावरणविषयी जाण तसेच माहिती मिळावी, या हेतुने येथील युवा कार्यकर्ता राकेश पून तसेच सहकाऱ्यांनी गोंडपिंपरी येथे वनोद्यान निर्मितीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांकडे मागणी रेटून धरली. या संदर्भात युवकांनी पत्र मोहिम व निवेदने देऊन वनोद्यान निर्मितीबाबत सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नास अखेर यश आले असून स्थानिक शहरातून मूल शहराकडे जाणाऱ्या मार्गालगत उत्तमराव पाटील वनोद्यान निर्मिती कामास प्रारंभ झाला आहे.
तत्पूर्वी ना. मुनगंटीवार यांनी युवकांच्या मागणीनुसार वनोद्यान निर्मितीबाबत त्वरित मंजुरी दिली होती. मात्र वनोद्यान निर्मिती स्थळाबाबत वनविभाग व काही स्थानिक नेते यांंच्यात स्थळाबाबत ताळमेळ न जुळल्याने वनोद्यान निर्मिती कार्यास विलंब झाला होता. आता मात्र सामाजिक वनीकरण विभागामार्फत तसेच वनविभाग व स्थानिक पदाधिकारी यांच्या समन्वय घडून वनोद्यान निर्मितीची जागा पक्की करण्यात आल्यावर गोंडपिंपरी- खराळपेठ या मार्गावर वनोद्यान निर्मितीचे कार्य झपाट्याने सुरू आहे.
गोंडपिंपरी तालुक्याला नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र वनोद्यानमुळे निश्चितच या तालुक्याला लाभ मिळणार असून युवकांच्या मागणीचे फलित असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)