प्रकल्पग्रस्तांचे खाण बंद आंदोलन प्रारंभ
By Admin | Updated: May 14, 2017 00:30 IST2017-05-14T00:30:18+5:302017-05-14T00:30:18+5:30
स्थानिक माजरी येथील नागलोन ओ.सी.-२ कोळसा खाण शनिवारपासून बंद पाडण्यात आली आहे.

प्रकल्पग्रस्तांचे खाण बंद आंदोलन प्रारंभ
माजरी वेकोलि : १५ हजार टन कोळशाचे उत्पादन ठप्प
राजेश रेवते । लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : स्थानिक माजरी येथील नागलोन ओ.सी.-२ कोळसा खाण शनिवारपासून बंद पाडण्यात आली आहे. नागलोन, पळसगाव, माजरी, पाटाळा येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी सहकुटुंब आंदोलनात उतरले आहेत. जोपर्यंत नोकरीचे आदेश देण्यात येणार नाही, तोपर्यंत खाण सुरू होणार नाही, असा इशारा दिला आहे.
जून-२०१५ मध्ये वेकोलिने माजरी, पळसगाव, नागलोन व पाटाळा येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करून प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नागलोन ओ.सी.-२ येथे कोळसा उत्पादन सुरू केले. दोन वर्षे होऊनही आतापर्यंत नोकरी न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी महिला व लहान मुलांसह तिसऱ्यांदा ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. यापूर्वी १ ते १० मार्चपर्यंत १० दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी १०२ प्रकल्पग्रस्तांपैकी २८ जणांना नोकरीत समावून घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात बैठक घेवून उर्वरित ७८ प्रकल्पग्रस्तांना ३० एप्रिलपर्यंत नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु आज १३ दिवस उलटले तरी त्यांना नोकरी मिळाली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा ५ मे रोजी चंद्रपूर येथे बैठक बोलावून वेकोलि अधिकाऱ्यांना फटकारले. परंतु वेकोली अधिकारी जिल्हाधिकारीच्या आदेशालासुद्धा मानायला तयार नाही. म्हणून प्रकल्पग्रस्तांना न्यायासाठी शनिवारपासून पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. या काम बंद आंदोलनामुळे वेकोलिचे १५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प झाले आहे. त्यातून ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.या आंदोलनात लिलेश ढवस, रवींद्र ढवस, संदीप झाडे, गजानन पारशिवे, रामू डोंगे, अनिल ताजने, गोकुल डोंगे, अविनाश ढवस, वासुदेव डंभारे, देविदास मशारकर, गिता ढवस, माया ढवस, विमल डोंगे, कलावती डंभारे, रंजीता झाडे, मंगला निमकर, कल्पना ढवस, शशीकला झाडे, सुनिता ढोक, मनिषा डोंगे, मीरा ढवस आंदोलनात सहभागी आहेत.
काम बंदमुळे परिणाम
प्रकल्पग्रस्तांचे काम बंद आंदोलनामुळे पावसाळ्यापूर्वीच काम ठप्प झाले आहे. कोराडी नाला हा डायर्व्हशन केला आहे. परंतु ते काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात जवळच्या गावात पुरामुळे गावात पाणी शिरू शकते, अशी शक्यता आहे. तसेच काम बंद आंदोलनामुळे कोळशाच्या साठ्याला आग लागू शकते. त्यातून चंद्रपूर वीज केंद्रात कोळसा पुरवठा होणार नाही.
एक महिन्याचा वेळ हवा
वेकोलि माजरीचे महाप्रबंधक एम. येलय्या यांनी प्रकल्पग्रस्तांना पत्र देवून काम बंद न पाडण्याचे आवाहन केले आहे. एक महिन्याचा वेळ द्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. परंतू प्रकल्पग्रस्त शेतकरी आता कोणत्याही प्रकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही. नोकरीचे आदेश मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील, असे मत व्यक्त केले.