घुग्घुस येथे सर्वधर्म परिषदेला प्रारंभ
By Admin | Updated: February 7, 2015 23:20 IST2015-02-07T23:20:25+5:302015-02-07T23:20:25+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी व सर्व संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ घुग्घुस येथील श्री वारकरी गुरुदेव भजन मंडाळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सर्वधर्म परिषदेचे

घुग्घुस येथे सर्वधर्म परिषदेला प्रारंभ
घुग्घुस: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी व सर्व संतांच्या स्मृतीप्रित्यर्थ घुग्घुस येथील श्री वारकरी गुरुदेव भजन मंडाळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सर्वधर्म परिषदेचे आज शनिवारी थाटात उदघाटन करण्यात आले.
पहिल्या दिवशीच्या प्रथम सत्रात शालेय विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा झाली. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य स्मिता ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे होते. यावेळी डाखरे महाराज, हळदे महाराज, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गावंडे गुरुजी, घुग्घुसचे उपसरपंच निरीक्षण तांड्रा, गोपालकृष्ण आकेवार, घोपटे यांची उपस्थिती होती.
तरुण पिढी बलशाली व्हावी, शैक्षणिक दर्जा, सार्वजनिक, धार्मिक व बौद्धिक विकास व्हावा, आजचे विद्यार्थी उद्याचे उत्कृष्ट नागरिक तयार करण्यात ग्रामगीतेतील सेवा सामर्थ हा महत्वाचा अध्याय आहे, असे मत जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. ग्रामगीतेचा अभ्यास करुन ते विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे व सेवाभवी बनावे, असे विचार प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता ठाकरे यांनी व्यक्त केले व श्री वारकरी गुरुदेव भजन मंडाळाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी हळदे महाराज, डाखरे महाराज, गोपालकृष्ण आकेवार यांनी विचार व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांकरिता दोन गटात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम गट ८ ते १० या विद्यार्थ्यांकरिता ग्रामगीता अध्याय ९ सेवा सामर्थ्य तर ११ ते पदवीधर विद्यार्थ्याकरिता ग्रामगीता अध्याय ३६ जीवनकला या विषयावरील स्पर्धेत हर्षा जेऊरकर प्रथम, कोमल नवले द्वितीय, प्राची तृतीय तर पदवीधर गटात जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या रुपाली बोढे प्रथम, भद्रावतीच्या विवेकानंद महाविद्यालयाच्या उज्वला नागपुरे द्वितीय व प्रशासकीय महाविद्यालय मोरवाच्या कोयल नवले या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाग घेतला. संचालन घोटेकर तर आभार शिरपूरकर यांनी मानले. (वार्ताहर)