महिला-बाल कल्याणाची ‘मन की बात’ प्रारंभ

By Admin | Updated: August 4, 2016 00:42 IST2016-08-04T00:42:42+5:302016-08-04T00:42:42+5:30

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, बालसंगोपन आदी...

Start of "Mann Ki Baat" of women and child welfare | महिला-बाल कल्याणाची ‘मन की बात’ प्रारंभ

महिला-बाल कल्याणाची ‘मन की बात’ प्रारंभ

रेडिओवर प्रसारण : जनजागृतीचा नवा फंडा
चंद्रपूर: जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, बालसंगोपन आदी विविध विषयांवर ‘माझी आंगणवाडी-माझी आनंदवाडी’ नावाने रेडिओवरून जनजागृती सुरू केली आहे. पहिला भाग गेल्या आठवड्यात शनिवारी प्रसारित करण्यात आला. त्यामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकला.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाद्वारे आंगणवाडीच्या माध्यतातून विविध योजना राबविण्यात येतात. महिलांचे आरोग्य व बाल संवर्धनाच्या दृष्टीने आंगणवाडीतून पोषण आहार, आरोग्यवर्धक गोळ्यांचे वाटप, तसेच आवश्यकता पडल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करण्यात येतात. माता व बालकांच्या विविध योजना राबविल्या जातात. मात्र, त्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतातच, असे नाही. महिला व बालकल्याण विभागाने आपली ‘मन की बात’ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता रेडिओ प्रसारणाचा पर्याय उपयोगात आणण्यात आला आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागात आदिवासी बहुल गावे आहेत. कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यू आदींचे प्रमाण दुर्गम गावांमध्ये अधिक असते. त्याकरिता त्यांच्यापर्यंत योजना पोहोचणे आवश्यक आहे. ती गरज लक्षात घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आॅगस्ट महिन्यापासून हे रेडिओ प्रक्षेपण सुरू करण्यावर भर दिला होता. मात्र, महिला व बालकल्याण विभागाचे तत्कालीन प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी वर्षभराचे नियोजन करून काही भागांचे कार्यक्रम तयार करण्याचे आदेश दिले. गेल्या २२ जुलैला नवीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय झोल्हे जिल्हा परिषदेत रूजू झाले आहेत. त्यांनी ३० जुलै रोजी कार्यक्रमाचा पहिला भाग रेडिओवरून प्रसारित केला. (प्रतिनिधी)

पालकमंत्र्यांचे प्रबोधन
या रेडिओ प्रसारणातील प्रत्येक एपिसोडमध्ये बाल गिते, बडबड गिते, नाटिका आदी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बालके व महिलांशी संबंधित योजनांची माहितीवर आधारित कार्यक्रम तयार करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर तज्ज्ञाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ३० जुलैच्या एपिसोडमध्ये नाटिका व पालकमंत्र्यांचे प्रबोधन होते.

दोन हजार रेडिओंचे वाटप
दुर्गम गावातील लोकांना महिला व बालकल्याण योजनांची माहिती व्हावी, याकरिता रेडिओ प्रसारण करण्यात येत आहे. मात्र, सर्व लोकांकडे रेडिओ उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन महिन्यांपूर्वी दोन हजार रेडिओ सेट (ट्रान्झिस्टर) वाटप करण्यात आले. त्याकरिता पॉवर ग्रीडने निधी उपलब्ध केला.

५२ एपिसोडचे
प्रसारण
रेडिओवरील कार्यक्रमाचे ५२ एपिसोड तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक एपिसोड दर शनिवारी रात्री ९.३० ते १० वाजतादरम्यान प्रसारण करण्यात येते. १० मिनिटाच्या कालावधीचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि २० मिनिटे कालावधीमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन तयार करण्यात येणार आहे.

Web Title: Start of "Mann Ki Baat" of women and child welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.