महाकाली यात्रेला प्रारंभ
By Admin | Updated: April 13, 2016 01:15 IST2016-04-13T01:15:01+5:302016-04-13T01:15:01+5:30
चंद्रपूर जिल्ह्याचे आराध्य दैवत माता महाकाली यात्रेला मंगळवारपासून येथे प्रारंभ झाला.

महाकाली यात्रेला प्रारंभ
महाकाले परिवाराकडून पूजा : गोंडराजे वीरेंद्रशहा आत्राम यांची मिरवणूक
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे आराध्य दैवत माता महाकाली यात्रेला मंगळवारपासून येथे प्रारंभ झाला.
महाकाले परिवाराच्यावतीने पहाटे ५.३० वाजता महाकाली मातेच्या पूजेला विधिवत प्रारंभ झाला. ७.३० वाजता आरती करण्यात आली. यावेळी महाकाले परिवारातील प्रकाश महाकाले, क्षमा महाकाले, निमिषा महाकाले यांच्यासह महाकाले परिवारातील सदस्य तथा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासोबतच मंगळवारी दुपारी परंपरेनुसार देवी महाकालीच्या पूजेसाठी गोंडराजाची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता स्थानिक समाधी वॉर्डातील राजवाड्यातून वाजत-गाजत मिरवणूक निघाली. माता महाकालीचा जयजकार करीत राजे वीरेंद्रशहा आत्राम यांची मिरवणूक काढण्यात आली. सर्वप्रथम चंद्रपूर नगरीच्या वैभव संपन्न किल्ल्यातील दक्षिण दरवाजाची पूजा करम्यात आली. त्यानंतर ही मिरवणूक गांधी चौक मार्गे पुढे निघाली. या मिरवणुकीत शेकडो युवक सहभागी झाले होते. गोंडराजे समाज सुधारक ट्रस्ट चांदागडसह अन्य संघटनांचे पदाधिकारी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक माता महाकाली मंदिरात पोहचल्यानंतर परंपरेनुसार महाकालीची ओटी भरून पूजा करण्यात आली. यावेळी गोंडराजे विरेंद्रशहा यांच्यासह मोहनसिंह मसराम, प्रा.धिरज शेडमाके, मनोज आत्राम बापूराव मडावी, भूमक संतोष मसराम प्रामुख्याने उपस्थित होते.
केवळ चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भासह मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील महाकालीच्या दर्शनासाठी यात्रेदरम्यान दरवर्षी हजारो भाविक येथे येतात. त्यानुसार यंदाही यात्रेदरम्यान भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होणार आहेत. (प्रतिनिधी)
मंगळवारपासून माता महाकाली यात्रेला प्रारंभ झाला. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. शहर पोलिसांसह सुमारे ४०० वर गृहरक्षक दलाचे कर्मचारी येथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. मंदिर परिसरात व आजुबाजूला पूजेच्या साहित्यासह खेळण्यांची दुकानेही सजली आहे. यातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. सुमारे एक महिना ही यात्रा राहणार आहे.