शिक्षकांचे साखळी उपोषण प्रारंभ
By Admin | Updated: May 23, 2017 00:33 IST2017-05-23T00:33:46+5:302017-05-23T00:33:46+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याबाबत शिक्षक संघटनांनी निवेदने, चर्चा, आंदोलने करून पाठपुरावा केला.

शिक्षकांचे साखळी उपोषण प्रारंभ
विविध समस्या : संघटना समन्वय समितीचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याबाबत शिक्षक संघटनांनी निवेदने, चर्चा, आंदोलने करून पाठपुरावा केला. तरीही अद्याप समस्या जैसे थे आहेत करिता सर्व संघटनांनी समन्वय समितीची स्थापना करीत जिल्हा परिषद चंद्रपूर समोर २२ ते २६ मेपर्यंत आयोजित साखळी उपोषण सोमवारपासून सुरू केले आहे.
मागील वर्षभरापासून प्राथमिक शिक्षकांची विषय शिक्षक पदस्थापना प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक शाळांमधील इयत्ता आठवीचे वर्ग तुटत आहेत, शिक्षक विनाकारण अतिरिक्त होत आहेत, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात अनेक शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांचे समायोजन रखडले आहे. वर्षभरापासून ७७२ शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीपासून वंचित आहेत, अवघड क्षेत्र निवडतांना अनेक तालुक्यात अन्याय झाला आहे, पंचायत समितीने सुचविलेली पात्र गावे घेण्यात आलेले नाहीत, जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी ३१ मे अंतिम तारीख असताना अद्याप काहीच हालचाल करण्यात आली नाही. यासह शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत.
याविरोधात कृती समितीने सर्वप्रथम ३० डिसेंबरला निवेदन दिले त्यानंतर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने २४ एप्रिलला व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने २८ एप्रिलला जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये प्रशासनाने सर्व समस्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता मे महिना उलटत चालला आहे. तरीही कोणतीही समस्या निकाली काढण्यात आलेली नाही.
त्याकरिता जिल्ह्यातील १७ शिक्षक व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत समन्वय समितीची स्थापना केली व सोमवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली.
पहिल्या दिवशी कैलास म्हस्के, चंद्रकांत पांडे, दीपक वर्हेकर, गणपत विधाते, संजय लांडे, साईबाबा इंदूरवार, आदेश वंजारी, मोरेश्वर बोन्डे, कालिदास वाळके, सुनील ढोके, अनिल आवळे, दुष्यांत निमकर, सुनील दुधे आदी शिक्षकांनी उपोषण केले. याप्रमाणे २६ मेपर्यंत दररोज प्रत्येक संघटनेचे दोन प्रतिनिधी उपोषण करणार आहेत.
साखळी उपोषणाचे नेतृत्व निमंत्रक विजय भोगेकर, सहनिमंत्रक मुकुंदा जोगी, कोषाध्यक्ष राजू लांजेकर, सहकोषाध्यक्ष अलका ठाकरे यांचेसह सदस्य ओमदास तुरानकर, उमाजी कोडापे, विलास बोबडे, संजय पडोळे, हरीश ससनकर, सुनील उईके, बंडू डाखरे, राजकुमार वेल्हेकर, नागेश सुखदेवे, रवींद्र उरकुडे, कविता गेडाम, नगाजी साळवे, गोसाई धोटे, राजू दर्वे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. साखळी उपोषणाला केंद्रप्रमुख संघटनेचे रामराव हरडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच पहिल्या दिवशी जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी आंदोलन मंडपाला भेट दिली.