चंद्रपूर श्वेतांबर जैन मंदिराच्या शताधिक महोत्सवाला प्रारंभ
By Admin | Updated: November 19, 2015 01:30 IST2015-11-19T01:30:05+5:302015-11-19T01:30:05+5:30
चंद्रपूर शहरातील श्री शांतिनाथ जिनालय श्री जैन श्वेतांबर मंदिराला शंभर वर्षापेक्षा अधिक काळ झाला.

चंद्रपूर श्वेतांबर जैन मंदिराच्या शताधिक महोत्सवाला प्रारंभ
विविध कार्यक्रमांचे आयोजन : चंद्रपूर शहरातून आज निघणार शोभायात्रा
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील श्री शांतिनाथ जिनालय श्री जैन श्वेतांबर मंदिराला शंभर वर्षापेक्षा अधिक काळ झाला. त्यामुळे यावर्षी शताधिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या पंचदिवसीय महोत्सवाचा शुभारंभ विचक्षण व्याख्यान मालाप्रसंगी जैन साध्वी श्री हेमप्रज्ञाजी महाराजांच्या मंगलमय उपस्थित सकल जैन समाजाचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया आणि श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष निर्दोषकुमार पुगलिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन करण्यात आले.
या पंचदिवशीय शताधिक महोत्सवाप्रसंगी दररोज सकाळी ९ ते १० देशातील मान्यवर अभ्यासू वक्त्यांचे प्रवचन, दुपारी जैन मंदिरात शांतीनाथ प्रभूची पूजा, अर्चना, अभिषेक आणि संध्याकाळी भक्ती संगीताचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता शोभायात्रा काढण्यात येईल. विचक्षण व्याख्यान मालेचे प्रथम पुष्प साध्वजी श्री हेमप्रज्ञाजी महाराजांनी गुंफले. जैन धर्माच्या साध्वी श्री विचक्षण श्रीजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही विचक्षण व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. विचक्षण महाराजांच्या जीवनकार्याबद्दल साध्वीजीनी प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, जे लोक स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर मानवी कल्याणासाठी जीवन जगतात, त्यांच्या हृदयात करुणा, प्रेम, दया, आंतप्रोत भरलेली असते. ज्यांच्या वाणीमध्ये मधुरता असून मुखातून नेहमी प्रभूनाम स्त्रवीत होत असतो. अशा संत श्रेणीतील विचक्षणजी होत्या, असे त्या म्हणाल्या.
बाल काळापासूनच त्यांना वैराग्य भावना प्राप्त झाली. लहान वयातच वडिलाचे निधन झाले. आजोबांची लाडकी नात पण मनात महान वैराग्य उदित झाले. वयाच्या केवळ ११ व्या वर्षी त्यांनी दीक्षा घेतली आणि संपूर्ण जीवन महावीर स्वामीची आराधना आणि जैन धर्माच्या सेवेत समर्पित केले, असे सांगितले.
साध्वीजी श्री हेमप्रज्ञाजी महाराज यांचा चातुर्मास चंद्रपूर येथे सुरू असून त्यांच्या सोबत त्यांच्या शिष्या पूज्य श्री आत्मदर्शनाजी पू.श्री आराधना श्री जी आणि पू.श्री क्षमानिधी श्रीजी महाराज ही उपस्थित आहेत.
विचक्षण व्याख्यानमाला २२ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी ९ ते १० पर्यंत श्री जैन भवन येथे होईल. १९ ला सकाळी साध्वीजीचे प्रवचन झाल्यानंतर लगेच शोभायात्रा प्रारंभ होईल. या शोभायात्रेत शांती भगवान यांची पालखी, जबलपूरची शहनाई, तुतारी, लुधियाना पंजाबचा पाईप बॅन्ड, राजनांदगावचा बॅन्ड, नेरची भजन मंडळी, मंगल कलशधारी महिला, महावीर स्वामींच्या जीवनावर आधारीत विविध दृष्ये राहणार आहेत.
या शोभायात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे तसेच सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्याची विनंती सकल जैन समाजाचे अध्यक्ष नरेश पुगलिया, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष निर्दोष पुगलिया, स्थानवासी श्री संघाचे अध्यक्ष योगेश भंडारी, दिगंबर चंद्रप्रभ मंदिर तुकूमचे अध्यक्ष डॉ. महावीर सोईतकर, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर चंद्रपूरचे अध्यक्ष सुभाष जैन, राजकुमार पुगलिया, योगेश पुगलिया, जीतदत्त सुरी, संदीप बांठीया, रोहित पुगलिया, राजू लोढा, राहुल पुगलिया, नीरज खजांची, अभिषेक कास्टीया, गौरव कोचर, गौतम कोठारी आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)