ओल्या पार्टीत अडकले कर्मचारी
By Admin | Updated: December 20, 2015 00:44 IST2015-12-20T00:44:57+5:302015-12-20T00:44:57+5:30
ओली पार्टी करताना खनिकर्म विभागाच्या चार कर्मचाऱ्यांना राजुरा पोलिसांनी शुक्रवारच्या रात्री अटक केली.

ओल्या पार्टीत अडकले कर्मचारी
राजुरा पोलिसांची कारवाई : खनिकर्मच्या चार कर्मचाऱ्यांचा समावेश
चंद्रपूर : ओली पार्टी करताना खनिकर्म विभागाच्या चार कर्मचाऱ्यांना राजुरा पोलिसांनी शुक्रवारच्या रात्री अटक केली. या घटनेने महसूल कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मनोज आकुलवार, अमर श्रीरामे, संजय इंगले व प्रदीप जुंगले यांचा समावेश आहे. हे चारही कर्मचारी चंद्रपुरातील निवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागात कार्यरत खनीज निरीक्षक मनोज आकुलवार याच्यासमवेत याच कार्यालयाचे कर्मचारी अमर श्रीरामे, संजय इंगले व प्रदीप जुंगले हे एका कंत्राटदारासोबत सर्व्हे करण्यासाठी गेले.
सर्व्हे झाल्यानंतर राजुर-बल्लारपूर मार्गावरील हाटेल विजय येथे ओली पार्टी करण्यासाठी थांबले.
या प्रकरणाची गोपनिय माहिती उपपोलीस अधीक्षक सुशीलकुमार नायक यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी हाटेलवर छापा मारून खनिकर्म विभागाच्या चार कर्मचाऱ्यांसह हाटेल व्यवसायी विजय महानंद याला दारू पिताना रंगेहाथ पकडले. यावेळी त्यांच्याकडून चार विदेशी दारूच्या बॉटल आढळल्या. येथेच अवैध दारूच्या बॉटल जप्त करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
अहवाल आल्यानंतर कारवाई : जिल्हाधिकारी
ओली पार्टी करताना अटक करण्यात आलेल्या खनिकर्म विभागाच्या कर्मचाऱ्यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागविला असल्याची माहिती, असे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.