खासगी व्यवस्थापनातील कर्मचारी भरती आता केंद्रीय परीक्षा पद्धतीने
By Admin | Updated: September 9, 2015 00:58 IST2015-09-09T00:58:07+5:302015-09-09T00:58:07+5:30
राज्यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागा भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा पद्धतीने भरण्यात याव्या, ....

खासगी व्यवस्थापनातील कर्मचारी भरती आता केंद्रीय परीक्षा पद्धतीने
घनश्याम नवघडे नागभीड
राज्यात खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागा भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा पद्धतीने भरण्यात याव्या, असे निर्देश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षण विभागाच्या संचालकांना दिले आहेत. या प्रकाराने खासगी व्यवस्थापन वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना केआरएद्वारे आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी एक कृती कार्यक्रम आखून दिला आहे. या कृती कार्यक्रमात खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती हा सुद्धा विषय आहे. या विषयाच्या अनुषंगाने ही पद्धत कशी राबवायची, याच्या काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
या मार्गदर्शक सूचनांनुसार रिक्त पदासाठी आॅनलाईन अर्ज मागविणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, लेखी परीक्षा घेणे, पेपर तपासणी, मुलाखती घेणे व निकाल जाहीर करणे या त्या मार्गदर्शक सूचना आहेत. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी या विभागाने एक कालमर्यादा विहीत केली असून ही कामे १० आॅक्टोबर ते १५ जानेवारी २०१६ या कालावधीत पार पाडावयाची आहेत.
खासगी संस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानीत व विनाअनुदानीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची माहिती १५ सप्टेंबरपर्यंत कळवावी, असे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने म्हटले आहे. ही माहिती सादर करताना शासनमान्य अनुदानीत व विनाअनुदानीत पदे विचारात घ्यावीत अशाही सूचना दिल्या आहेत. या पदांमधील रिक्त पदे भरताना शासनाने विहीत केलेली पटसंख्या, आरक्षण व इतर निकष विचारात घ्यावेत. अतिरिक्त शिक्षकांचाही विचार करण्यात यावा, जेणेकरुन अनावश्यक पद भरती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.