महिलांचे ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: February 10, 2016 00:59 IST2016-02-10T00:59:21+5:302016-02-10T00:59:21+5:30
गुरुदेव सेवा मंडळाच्या सार्वजनिक प्रार्थना मंदिराकरिता जागा देण्याकरिता २६ जानेवारीला महिलांच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला.

महिलांचे ठिय्या आंदोलन
घोडपेठ ग्रामपंचायत : प्रार्थना मंदिरासाठी जागा देण्याची मागणी
घोडपेठ : गुरुदेव सेवा मंडळाच्या सार्वजनिक प्रार्थना मंदिराकरिता जागा देण्याकरिता २६ जानेवारीला महिलांच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला. तो ठराव ग्रामसभेमध्येही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मात्र गावातील महिलांना ठरावाचे पत्र देण्यात आले नाही. ठरावाच्या पत्राच्या मागणीसाठी मंगळवारी घोडपेठ येथील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सकाळी १० वाजतापासून ठिय्या आंदोलन सुरू केले.
घोडपेठ येथील मुख्य सर्व्हे क्र. ३७२ नुसार १०० व १००/१ या रिकाम्या प्लॉटवर अनेक वर्षापासून गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिराकरिता गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिक्रमीत केले आहे. २६ जानेवारीला महिलांच्या विशेष ग्रामसभेमध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना मंदिराकरिता जागा देण्यासाठी ठराव घेण्यात आला, तो मंजूरही झाला. हा ठराव सार्वजनिक ग्रामसभेमध्येही घेण्यात आला. मात्र ठरावाच्या प्रती देण्यात आल्या नाही. या ठरावाच्या प्रतीच्या मागणीसाठी घोडपेठ येथील महिलांचे सोमवारी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले.
२६ जानेवारीपासून ग्रामसेवक विलास भिवगडे महिलांना ठरावाची प्रत देण्यास दिरंगाई करीत आहे. ग्रामसेवकाने सांगितल्यानुसार महिला सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाल्या. मात्र सकाळपासून ग्रामसेवक आलाच नाही. सायंकाळी ७ वाजता ग्रामसेवकाने स्वत:चा भ्रमणध्वनी बंद केला. यावेळी गावकऱ्यांनी शासनाच्या विविध स्तरावरील अधिकाऱ्यांशी संपर्क केला. सायंकाळी साडेसात वाजता पंचायत समिती भद्रावतीचे विस्तार अधिकारी बारसागडे, जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले.
यावेळी भाजपाचे तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे, सेवकराम मिलमिले, वैशाली डुडुरे, माजी उपसभापती यशवंत वाघ, पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर रंगारी, उपसरपंच विनोद घुगुल, विनोद सातपुते उपस्थित होते. ग्रामसेवकाने ठरावाची प्रत देण्यात यावी एवढी साधी नागरिकांची मागणी आहे. मात्र ग्रामसेवक कार्यालयात न फिरकल्याने त्याचे ठराव प्रोसिडिंग बुकात लिहिला नसल्याचा नागरिकांचा अंदाज आहे. त्यामुळे दोषी ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या विषयावर अद्यापही तोडगा निघाला नव्हता. (वार्ताहर)