श्री तिरुपती बालाजी ब्रह्मोत्सव सोहळा
By Admin | Updated: December 28, 2016 02:05 IST2016-12-28T02:05:11+5:302016-12-28T02:05:11+5:30
चुनाळा येथील श्री तिरुपती बालाजी देवस्थानात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन ११ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त

श्री तिरुपती बालाजी ब्रह्मोत्सव सोहळा
नवविवाहित जोडप्यांचा सत्कार : विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम
राजुरा : चुनाळा येथील श्री तिरुपती बालाजी देवस्थानात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन ११ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त देवस्थान कमिटीच्या वतीने २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत ११ व्या ब्रह्मोेत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते. त्या अंतर्गत विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त चुनाळा येथे चार दिवस बालाजी भक्तजनांचा मेळा भरला होता. या ब्रह्मोेत्सवांतर्गत २३२ मोतिबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे सदर रुग्णांना दृष्टी मिळणार आहे. चार दिवस चाललेल्या सोहळ्याची सांगता १०-१२ हजाराहून अधिक भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करुन करण्यात आली.
राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे श्री तिरुपती बालाजीची प्रतिष्ठापणा केल्यामुळे परिसरातील बालाजी भक्तांना दर्शन घेणे सोयेस्कर झाले. देवस्थानात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होऊन ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे देवस्थान कमिटीच्या वतीने ब्रह्मोेत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत या ११ व्या ब्रम्होत्सव सोहळ्यामध्ये विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मोेत्सवाची सुरुवात ग्रामसफाई व जनजागृती दिंडीने करण्यात आली. गावातील नागरिक, श्री संप्रदाय सेवा समितीचे सदस्य, शिवाजी विद्यालय, जि.प. मराठी व तेलगू शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारी, सर्व महिला बचत गटातील सदस्य सहभागी झाले होते. गावाची तसेच देवस्थान परिसराची स्वच्छता करून गावात स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात २२ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला.
तसेच देवस्थानाच्या वतीने चुनाळा येथील सासरी गेलेल्या मुलींचा जावयांसह सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मागील वर्षी लग्न झालेल्या मुलींना व जावयांना आमंत्रित करून त्यांचा शाल, श्रीफळ व ब्लाऊज पीस देऊन या दाम्पतीचा सत्कार देवस्थानाच्या वतीने माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केला.
त्यानंतर मोर्शी जि. अमरावती येथील लक्ष्मणदास काळे महाराज यांनी आपल्या गोपालकाल्याच्या प्रवचनातून चुनाळा येथील नागरिकांना प्रबोधन केले. यानंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये परिसरातील १०-१२ हजार भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेऊन ब्रम्होत्सवाची सांगता झाली. या ब्रम्होत्सव सोहळ्याकरिता देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव वाय. राधाकृष्ण, शामबाबु पुगलिया, शंकर पेद्दूरवार, सुरेश सारडा, मनोज पावडे, गोरखनाथ शुंभ, अशोक शहा, श्री संप्रदाय सेवा समिती तथा समस्त चुनाळा ग्रामवासीयांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
४परिसरातील गरजू अंध रुग्णांना उपचार होऊन दृष्टी लाभावी याकरीता दरवर्षी देवस्थानाच्या वतीने लॉयन्स क्लब चंद्रपूर व मेडिकल कॉलेज सेवाग्राम यांच्या सहकार्याने विनामूल्य मोतिबिंदू डोळे तपासणी व कृत्रिम मोतिबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात परिसरातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यात जवळपास ५६० रुग्णांनी नोंदणी करून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २३२२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून या सर्व रुग्णांना देवस्थानाच्या वतीने दृष्टी मिळणार आहे.