क्रीडा संकुल देत आहे दुखापतीला निमंत्रण
By Admin | Updated: June 15, 2017 00:34 IST2017-06-15T00:34:32+5:302017-06-15T00:34:32+5:30
काही वर्षांपूर्वी वरोरा शहरात क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आल्याने खेळाडूमध्ये आनंद पसरले होते.

क्रीडा संकुल देत आहे दुखापतीला निमंत्रण
वरोरा येथील प्रकार : खेळाडूंना सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष
प्रवीण खिरटकर । लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : काही वर्षांपूर्वी वरोरा शहरात क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आल्याने खेळाडूमध्ये आनंद पसरले होते. मात्र सध्या येथील क्रीडा संकुलाची दयनीय अवस्थेकडे वाटचाल सुरू असून क्रीडा संकुलात पहिल्याच पावसात मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना सराव करताना अपघात होऊन दुखापतग्रस्त व्हावे लागत आहे. त्यामुळे वरोरा तालुका क्रीडा संकुल खेळाडूंना दुखापतीला निमंत्रण देणारे ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
वरोरा शहरातील खेळाडूंना तसेच स्पर्धा परीक्षेकरिता मैदानी चाचणी देण्याच्या सरावाकरिता वरोरा शहराच्या मध्यभागी काही वर्षांपूर्वी क्रीडा संकुलाची नििर्मती करण्यात आली. यामध्ये जीम करीता रुम व साहित्य, बॅडमिंटन हॉल, प्रेक्षकांना बसण्याकरिता गॅलरी, ट्रॅक, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो आर्चरी करीता मैदाने तयार करण्यात आले. लहान मुलांकरिता खेळणीही लावण्यात आली आहे.
त्यामुळे या क्रीडा संकुलामध्ये अनेक प्रौढ व्यक्ती सकाळी व सायंकाळी फिरण्यास येत असतात. अनेक युवक-युवतीही मैदानी सरावही करत असतात. मात्र पाऊस झाल्यास साचलेले पावसाचे पाणी बाहेर निघण्याची कुठलीही व्यवस्था मैदानात नाही. त्यामुळे पावसाचे पाणी मैदानावर झिरपत मैदानामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत.
जमिनीला तडे गेल्याने त्यापासूनही खड्डे तयार झाले आहे. मैदानावर वीज व्यवस्था नसल्याने पहाटे व अंधार पडल्यानंतर सराव करणाऱ्यांमध्ये खड्ड्यांची भिती असते. मैदानावरील काही खड्डे जमिनीच्या समपातळीत असल्याने सराव करताना काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
जीम साहित्य बेवारस
तालुका क्रीडा संकुलात जीमचे साहित्य असून त्याकरिता एक स्वतंत्र खोली आहे. येथे शहरातील युवक नियमित व्यायाम करतात. मात्र या खोलीच्या भिंती व दरवाजा अनेक दिवसांपासून फूटलेला आहेत. त्यामुळे जीमच्या दरवाजाला कुलूप लावूनही जीमचे साहित्य खिडकीतून चोरी जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी जीममधील काही साहित्य लंपास झाले आहे.
पाण्याची व्यवस्था नाही
नियमित सराव करणारे खेळाडू मैदानावर पाणी मारतात. त्यांना पाईपद्वारे मैदानावर पाणी मारण्यास मनाई केली जात आहे. खेळाडू नजीकच्या हातपंपावरुन पाणी आणून मैदानावर टाकत असतात. खेळाडूंना पिण्याचे पाणीही येथे उपलब्ध नाही. असे एक ना अनेक समस्या येथे दिसून येतात.
चेंजिंग रूम, शौचालयाचा अभाव
युवती व महिला खेळाडूकरिता क्रीडा संकुलात चेंजीग रुम व शौचालय आवश्यक आहे. मात्र दोन्ही गोष्टी उपलब्ध नसल्याने सरावाच्या व सामान्याच्या वेळी मोठी अडचण निर्माण होत असते.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
क्रीडा संकुलामध्ये डुकरे व जनावरे मुक्त संचार करीत असतात. मैदानावरील खड्डे बुजविले जात नाही. रात्री दारुड्यांचा हैदोस राहत असल्याने खाली बाटल्यांवरुन आढळून समजते. मैदानावर पुरेसा विजेचा प्रकाश राहत नाही. जीम साहित्य व इतर साहित्याची देखभाल नाही. शासनाने क्रीडा संकुलनाच्या व्यवस्थापनाकरिता समिती नेमली. त्यामुळे काहींना येथे माधनावर नियुक्त करण्यात आले. यामुळे हजारो रुपयांचा खर्च होत आहे. मात्र असे असूनही देखभालीकडे कुणीही लक्ष देत नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.