मनरेगावर १० कोटी खर्च
By Admin | Updated: February 3, 2016 00:51 IST2016-02-03T00:51:12+5:302016-02-03T00:51:12+5:30
‘मागेल त्या हाताला काम द्या’ असे शासनाचे ब्रिद आहे. रोहयोच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात असली तरी अनेकांना बेरोजगारच रहावे लागत होते.

मनरेगावर १० कोटी खर्च
जिल्ह्यात चिमूरची आघाडी : वर्षभरात ३ लाख ५३ हजार मनुष्य दिवसांची निर्मिती
राजकुमार चुनारकर खडसंगी
‘मागेल त्या हाताला काम द्या’ असे शासनाचे ब्रिद आहे. रोहयोच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात असली तरी अनेकांना बेरोजगारच रहावे लागत होते. आता शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत ६० टक्के मजूर व ४० टक्के मशनरी असे गुणोत्तर ठरविले असल्याने अनेकांच्या हाताला कामे मिळाली आहेत. दुष्काळी परिस्थिती असली तरी चिमूर तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये नऊ कोटी ९५ लाख रुपयांचा खर्च झाला असून बऱ्यापैकी हाताला रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यात या कामात चिमूर तालुक्याने आघाडी घेतली आहे.
देशातील बेरोजगारीवर ठोस उतारा म्हणून तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. मात्र यातील गुणोत्तरात ग्रामसेवकासह अभियंता प्रवर्गातील अधिकाऱ्यांनीही कुशल - अकुशलमध्ये फेरफार दाखविल्याचे चित्र दिसून आले आहे. ६०-४० च्या गुणोत्तरांमध्ये अनेक योजनांमधील तसेच भ्रष्टाचाराच्या प्रकारावर अंकूश बसलेला आहे.
यात दुर्दैव असे की वाढत्या महागईतही रोजगार हमी योजनेच्या मजुरांना फक्त १६८ रुपये मजुरी देण्याचीच परंपरा केंद्र सरकारने कायम राखलेली आहे. मागील वर्षी काही भागात दुष्काळ असला तरी या योजनेचा कोणी प्रखरतेने वाली नसल्याचेही काही ग्रामपंचायतीमध्ये जाणवत आहे.
यावर्षीपासून अकुशलपोटी मजुरावर जास्त खर्च करण्याची मर्यादा पाळल्याने काही गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या कृपेने चांगली मजुरी मिळालेली आहे. मागील वर्षात अकुशलवर ६ कोटी ४५ लाख तर कुशल बाबीवर ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती रोजगार हमी योजना कार्यालयातून देण्यात आली. चिमूर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतीमध्ये मागील वर्षात मनरेगावर ९ कोटी ९५ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यामध्ये तीन लाख ५३ हजार मनुष्य दिवसांची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये अंदाजे दहा हजार मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती पंचायत समिती स्तरावरुन सांगण्यात येत आहे. ९ कोटी ९५ लाखांच्या कामात अकुशल कामावर ६ कोटी ४५ लाख तर कुशलवर ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च करीत हजारो मजुरांना रोजगार मिळाला असून यामध्ये अनेक गावात पांदन रस्ते, शेततळे, विहिरी ही कामे झाली आहेत.
गुणोत्तर प्रमाण ठेवूनच यंदा झाला खर्च
मागील वर्षाअगोदर सरसकट खर्च करण्याच्या नादात व ग्रामसेवक, अभियंता वर्गातील अधिकाऱ्यांमुळे रोजगार हमी योजनेचे गुणोत्तर बिघडले होते. त्याचाच फटका हजारो इच्छुक लाभार्थ्यांना बसला होता. मात्र मागील वर्षी प्रशासकीय खर्चापोटी ९ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी खर्चुन हे गुणोत्तर पाळण्याचे मोठे आव्हान प्रशासनाने पूर्ण केले आहे. यदा ६०:४० (अकुशल, कुशल) या गुणोत्तराने हे कामे करण्यात आली आहेत.
सन २०१५-१६ मध्ये १० कोटी रुपयांचा निधी मनरेगा अंतर्गत खर्च करण्यात आला. त्यामध्ये अंदाजे दहा हजार मजुरांना रोजगार देण्यात आला. जूनअखेरपर्यंत या वर्षात १५ कोटी रुपयांची कामे करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत मनरेगामधून शेततळे, सिंचन विहीर, तलाव खोलीकरण यासारखी कामे करण्यात येणार आहेत.
- मिलिंद कुरसंगे, विस्तार अधिकारी (मनरेगा) पं.स. चिमूर