अध्यक्षांना शेतकऱ्यांविषयी देणेघेणे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 00:52 IST2016-03-20T00:52:15+5:302016-03-20T00:52:15+5:30
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना ९० टक्के सुटीवर फायबर क्रेट पुरविण्याची योजना स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आली.

अध्यक्षांना शेतकऱ्यांविषयी देणेघेणे नाही
कल्पना बोरकर यांचा आरोप : फायबर क्रेट पुरवठ्याची योजना नामंजूर
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना ९० टक्के सुटीवर फायबर क्रेट पुरविण्याची योजना स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आली. त्यानंतर रितसर ई निविदा काढण्यात आली. आलेल्या दरास मान्यता देण्याकरिता स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी मनमानी करून ही योजना नामंजूर केल्याचा आरोप उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या हिताची योजना असूनही ती नामंजूृर केल्याने अध्यक्षांना शेतकऱ्यांविषयी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला आहे.
ज्या पुरवठाधारकास ही निविदा संमत झाली आहे, त्यांनी मागील वर्षी सन २०१४-१५ मध्ये महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण विभागाला शिलाई मशीनचा पुरवठा केला. मात्र चिमूर पंचायत समितीमधील काही मशीनमध्ये पायदान पुरविले नाही. त्यावर चर्चा होऊन संबंधित पुरवठाधारकाने आठ दिवसात पायदान पुरवठा करून द्यावा, असे ठरवून विषयाला मंजुरी देण्यात आली. वास्तविक मागील वर्षी महिला व बालकल्याण विभागाला पुरविण्यात आलेल्या शिलाई मशीनचा यावर्षी कृषी विभागाला पुरवठा होत असलेल्या फायबर क्रेटशी काहीच संबंध नसताना विरोधकांशी हातमिळवणी करून फायबर क्रेटचा पुरवठा अडविला. यावर सभेमध्ये उपस्थित सदस्यांची मते नोंदविण्यात आली. यामध्ये सात विरुध्द पाच सदस्यांनी फायबर क्रेट शेतकऱ्यांना तात्काळ पुरवठा करावा, असे नोंदविले. महत्त्वाचे म्हणजे अध्यक्षांनीही बाजुने मत नोंदविले. असे असताना प्रत्यक्षात कार्यवृत्तात एक महिन्यानंतर विषय नामंजूर करण्यात आला. विशेष असे की याच वर्धमान इंडस्ट्री, चंद्रपूरला २०१५-१६ या वित्तीय वर्षातील ९३ लाखांचे शिलाई मशीनचे टेंडर मंजूर केले आहे. त्यासोबतच पंचायत विभागाकडून घंटागाडी खरेदी, आरोग्य विभागाकडून साहित्य खरेदी याचेही टेंडर वर्धमान इंडस्ट्रीलाच आहे. त्याला अध्यक्षांचा विरोध नाही. असे असताना कृषी विभागाबाबतच वेगळा निकष का, असा सवाल कल्पना बोरकर यांनी उपस्थित केला आहे. (शहर प्रतिनिधी)