एस.पी. विधी महाविद्यालयात विधी संशोधन पद्धतीवर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 01:06 IST2016-05-09T01:06:39+5:302016-05-09T01:06:39+5:30

शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील आंतरिक गुणवत्ता निश्चित समिती आणि उच्च शिक्षण व संशोधन केंद्र ...

S.P. Workshops on Rituals | एस.पी. विधी महाविद्यालयात विधी संशोधन पद्धतीवर कार्यशाळा

एस.पी. विधी महाविद्यालयात विधी संशोधन पद्धतीवर कार्यशाळा

चंद्रपूर : शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील आंतरिक गुणवत्ता निश्चित समिती आणि उच्च शिक्षण व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नागपूर विद्यापिठाचे पदव्यूत्तर विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिरीष देशपांडे कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अंजली हस्तक यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली. रातुम नागपूर विद्यापीठातील डॉ. पायल ठावरी व प्रा. सचिन त्रिपाठी यांचे कार्यशाळेला मार्गदर्शन लाभले.
डॉ. शिरीष देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सैधांतिक संशोधन पद्धती तसेच प्रयोगसिद्ध संशोधन पद्धती यांचे तुलनात्मक महत्व विषद करून दोन्ही संशोधन पद्धती, विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या महत्वपूर्ण पध्दती आहेत, असे सांगीतले. संशोधकांनी संशोधन कार्याची निवड करताना समस्येचे निराकरण करण्यासाठी योग्य अशा संशोधन पद्धतीची निवड करून परिणामकारक उपाययोजना शोधून काढण्याचे कार्य करावे, असे डॉ. देशपांडे यांनी आवाहन केले.
डॉ. पायल ठावरी यांनी संगणकीय तंत्राचा वापर करून समाजिक विधी संशोधन पद्धती विषयक सादरीकरण केले.
कायदा व नियम हे समाजातील प्रत्येक घटक, चाली-रिती यांच्याशी संलग्नीत असल्यामुळे कोणत्याही सामाजिक समस्येची सोडवणूक ही विविध कायद्याचा संशोधकीय अभ्यास करून परिणामकारकरित्या सोडविल्या जाऊ शकते, असे डॉ. ठावरी यांनी सांगितले. संशोधकाने संशोधनाचा विषय, त्याची उद्दिष्टे, संशोधनाचे स्वरूप व व्याप्ती, गृहीतके, संशोधन पद्धती आदी कशा पद्धतीने निवडाव्या, या विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रा. सचिन त्रिपाठी यांनी संशोधनाचे प्राथमिक व दुय्यम स्त्रोत यांचा वापर करताना संशोधकाने प्रत्येक स्त्रोत ज्या माध्यमातून स्वीकारला आहे, त्याचा योग्य उल्लेख कशा पद्धतीने करावा, विषय सूची, संदर्भ सुची सैधांतिकरित्या कशा पद्धतीने तयार करावी, या विषयी सादरीकरण केले. संशोधकांनी संदर्भसुची तयार करण्याच्या नवीन पद्धतीचा सराव करूनच आदर्श अशी संदर्भसुची आपल्या संशोधन अहवालात नमुद करावी, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. अंजली हस्तक यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात कार्यशाळा आयोजित करण्यामागची भूमिका विषद करून सुनियोजित पद्धतीने संशोधन कसे करावे, या विषयी प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन करावे, असे सांगितले. महाविद्यालयातील पदव्युत्तर विभाग व उच्च शिक्षण व संशोधन केंद्रामार्फत ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. डॉ. पंकज काकडे यांनी संचालन केले. तसेच प्रा. अश्विनी बल्की यांनी आभार मानले. पदव्यूत्तर विभाग प्रमुख डॉ. आय.जे. राव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस.के. दत्ता, डॉ. पूर्णेदू कार यांनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: S.P. Workshops on Rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.