सोयाबीनचे उत्पादन घटले ; शेतकरी चिंतेत
By Admin | Updated: November 7, 2015 00:44 IST2015-11-07T00:44:15+5:302015-11-07T00:44:15+5:30
नगदी पीक म्हणून दिवाळीत बळीराजाच्या घरी प्रकाशाचे दिवे पेटविणारे सोयाबीन यंदा अडचणीत सापडले आहे.

सोयाबीनचे उत्पादन घटले ; शेतकरी चिंतेत
प्रतिएकर दीड क्विंटलचे उत्पादन : बळीराजाची दिवाळी अंधारात जाणार
गोंडपिंपरी : नगदी पीक म्हणून दिवाळीत बळीराजाच्या घरी प्रकाशाचे दिवे पेटविणारे सोयाबीन यंदा अडचणीत सापडले आहे. ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने विदर्भात सोयाबीन पिकाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. कधीकाळी एकरात सहा ते आठ क्विंटलचे उत्पन्न घेणाऱ्या बळीराजाच्या पदरी यावेळेस एक- दोन क्विंटल सोयाबीन हाती आले आहे. फायदा तर सोडा, उत्पादन खर्चही न निघाल्याने बळीराजापुढे मोठे संकट उभे आहे.
दिवाळी साजरी करण्याच्या बळीराजाच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे बघितले जाते. साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीत निघणारे सोयाबीन बळीराजाला आर्थिक स्थैर्य मिळवून देत होते. दिवाळीच्या आधी हे पीक निघत असल्याने यावर त्यांची दिवाळी अवलंबून असायची. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या स्थितीत याच पिकाने बळीराजाला मोठा आधार दिला. एकरी सहा ते सात क्विंटल असा सोयाबीनचा सरासरी फेरा होता. काही शेतकऱ्यांनी तर एकरी नऊ क्विंटल एवढे उत्पादन घेतले आहे.
यावेळी मात्र उलटेच घडले. ऐनवेळी पावसाने पाठ फिरविली. ऐन पिकाच्या भरणीच्या मोसमात पावसाने दडी मारल्याने दाण्यांची भरणी झाली नाही. शेंगा न भरल्याने सोयाबीनचा दाणा बारीक आला. ज्या शेतात एकरी सहा ते सात क्विंटल सोयाबीन व्हायचे, तिथे केवळ एक ते दोनच क्विंटल सोयाबीन हाती आले. त्यामुळे सोयाबीनसोबत असणारी बळीराजाची स्वप्नेही भंगली. विदर्भातील विशेषत: पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. दोन महिन्यांत निघणाऱ्या पिकाला नगदी पीक म्हणून शेतकरीबांधव पसंतीही देतात. मात्र यावेळेस सोयाबीनचे गणितच बिघडले. सध्या सोयाबिनला बाजारात ३३०० ते ३४०० एवढा बाजारभाव आहे. एका एकरात एक सोयाबीन बॅगची पेरणी केल्यापासून तो निघेपर्यंत साधारणत: सात ते साडेसात हजार रुपये खर्च येतो. अशात एकरात एक ते दोन क्विंटल सोयाबिन निघालेल्या बळीराजाची खस्ता हालत आहे. उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. बाजार समित्यांतही सोयाबिनची आवक कमी झाली आहे. कृषी विभागानेही पीक कापणी निष्कर्षातून हेक्टरी चार ते पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन निघाल्याचा शेरा दिलेला आहे. वातावरणातील असंतुलन, कमी पर्जन्यमान व कीडरोग आल्याने सोयाबीनच्या उत्पादनात यंदा कमालीची घट झाली असल्याचे विदारक चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)