सोयाबीनचे बियाणे " २६०० अन् मालाला भाव " २८००
By Admin | Updated: October 27, 2014 22:33 IST2014-10-27T22:33:07+5:302014-10-27T22:33:07+5:30
सध्या शेतामधून सोयाबीन पीक निघताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटताना दिसत आहे. याउलट शेतकऱ्यांच्या घरी माल येत असला तरी बाजारात सोयाबीनला

सोयाबीनचे बियाणे " २६०० अन् मालाला भाव " २८००
लखमापूर : सध्या शेतामधून सोयाबीन पीक निघताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटताना दिसत आहे. याउलट शेतकऱ्यांच्या घरी माल येत असला तरी बाजारात सोयाबीनला २५०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. चालु हंगामाच्या सुरुवातीला गेल्या वर्षीच्या तुलनेत ७०० ते ८०० रुपये जास्त किंमत देऊनही शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करावे लागले. गेल्या वर्षी सोयाबीनची एक बॅग १७०० ते १८०० रुपयात शेतकऱ्यांना मिळाली. त्यावेळी भाव ३२०० ते ३७०० पर्यंत मिळाला. मात्र यावर्षी २६०० ते २७०० रुपये बॅग खरेदी करुन भाव मात्र २८०० रुपयेच मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरुन निघताना दिसत नाही.
साधारणत दिवाळीत सदर पीक शेतकऱ्यांच्या घरी येते. परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांना पीक निघण्यात बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. सोयाबीन हे नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवड करीत असतो. याचाच फायदा घेत व गेल्या वर्षीच्या अकाली पावसाचे निमित्त साधत बियाणे कंपन्यांनी पुरवठा अल्यल्प असल्याचे आधीच घोषित केले. कुठे बियाणे खरदी केल्यानंतर त्याची उगवणसुद्धा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागला. एकीकडे शेतकऱ्यांच्या घरी पीक न आल्याने दिवाळी अंधारात गेली तर दुसरीकडे आता पीक हाती येत असताना भाव नाही. अशा परिस्थितीत शेती कशी करावी, असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. त्यातही कमी पावसामुळे सोयाबीन बियांचा आकारही कमी असून शेगांची लागण क्षमताही कमी प्रमाणात दिसून येत आहे. जमिनीत पुरेशा प्रमाणात ओल नसल्याने दरवर्षी रबी हंगामात गहु, हरभरा आदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची आशा आता मावळली आहे. रबी पिके कोरडवाहू जमिनीत बरेच शेतकरी घेतात. मात्र यावर्षी शेतजमिनीवर रबी पिकांची लागवड होणे अवघड दिसत आहे. (वार्ताहर)