Sow with balanced soil texture and water | जमिनीचा पोत व पाण्याचा समतोल साधूनच पेरणी करा

जमिनीचा पोत व पाण्याचा समतोल साधूनच पेरणी करा

ठळक मुद्देउत्पन्न वाढीसाठी प्रयत्न : शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अधिकाधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कमी आणि मध्यम कालावधीचे म्हणजेच १२० ते १२५ दिवसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड करावी तसेच जमिनीचा व पाण्याचा समतोल साधून शेतकऱ्यांनी पेरणी करीत आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतरी सध्या खरीप हंगामाची तयारी करीत आहे. त्यामुळे कृषी विभागाने तालुकापातळीवर जनजागृती सुरू केली आहे.
मध्यम कालावधीच्या धान पिकाची लागवड केल्यास धानपीक १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत काढणीस येते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता कमी व मध्यम कालावधीच्या बियाण्याची लागवड केल्यास अपेक्षित उत्पन्न वाढून रब्बी पिकांच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मध्यम कालावधीचे बियाणे फायदेशीर ठरते. ऑक्टोबर महिन्यात जमिनीत जास्त ओलावा राहत असल्याने रब्बी पिकाच्या उत्पन्नात देखील चांगली वाढ होते. धानपीक लागवड करताना श्री पद्धत, सगुना व पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. भात पिकासोबतच शेतकऱ्यांनी खरीप हंगामात तूर, सोयाबिन, मका, कापूस, मुंग, उडीद अशा पिकांची लागवड केल्यास जमिनीचा पोत सुधारुन शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होते. शेतकऱ्यांनी घरच्याघरी बीज प्रक्रिया करुन बियाणे खरेदीसाठी होणाऱ्या खर्चात बचत करावी, बियाणे खरेदीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाच्या मार्गदर्शनात तीन टक्के मिठाच्या द्रावणाची व बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया ही भातपिकासाठी करावी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. यासाठी कृषी सहायकांमार्फत मागदर्शन केले जात आहे. गावातील नोंदणीकृत गटामार्फत शेतकऱ्यांना एकत्रित खतांची व पाण्याची एकत्रित मागणी केल्यास शेतकऱ्यांना कृषी केंद्र व शेतकरी बचत गटामार्फत बियाणे पोहचविले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य बियाणांची लागवड करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

बियाणे खरेदी करताना काळजी घ्या
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळामध्ये उद्याची आवश्यकता काय, हे बघून पिकाची पद्धत ठरवावी, सोबतच आपली कौटुंबिक परिस्थिती जमिनीची पत आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार देखील यासाठी व्हावा, अशा सूचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी परवाना धारक बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. खरेदी केलेल्या बियाण्याबाबत संपूर्ण तपशिल असलेले उदा. पिक वाण, लेबल, नंबर,परवाना तपासणीचा दिनांक, मुदत, बियाणे किंमत, खरेदीदारांचे उत्पादकाचे, विक्रेत्यांचे नाव तसेच विक्रेत्यांची सही, रोखी अथवा उधारीची पावती घ्यावी.

Web Title: Sow with balanced soil texture and water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.